श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीला दोन लाखांची मदत

पिंपळे गुरव, दि. १६( punetoday9news):-  श्री दत्त जयंती जन्मोत्सवानिमित्त कासारवाडीतील श्री दत्त साई सेवा कुंज येथे कीर्तन महोत्सव सुरू असून, या महोत्सवात महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजयआण्णा गणपतराव जगताप यांच्यावतीने एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले. तसेच भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
श्री दत्त जयंती जन्मोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून, विजयआण्णा गणपतराव जगताप यांनी कीर्तन सोहळ्यातील एका दिवसाचे अन्नदान केले. परिसरातील सर्व नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.याबरोबरच श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमात अहोरात्र सेवा करणारे ह.भ.प. शिवानंद महाराज यांना भेट म्हणून एक किलो चांदीची रुद्राक्ष माळ भेट देण्यात आली. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या बांधकामासाठी श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांच्याकडे दोन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
यावेळी ह.भ.प.वांजळे महाराज, ह.भ.प. वाघ महाराज, श्री दत्त साई सेवा कुंजचे ह .भ .प. शिवानंद महाराज, महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
श्री क्षेत्र भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी सांगितले, की विजूआण्णा जगताप यांनी प्रदान केलेली निधीरुपी मदत भंडारा डोंगरावर सुरू असलेल्या बांधकामासाठी खूप मोलाची आहे. आपल्याकडील थोडी पुंजी सामाजिक कार्यासाठी देऊन विजूआण्णा जगताप यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे. अन्नदानासारखे दुसरे उत्तम कार्य दुसरे नाही.

 

Comments are closed

error: Content is protected !!