मुंबई ,दि.१७(punetoday9news):- शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर केल्या असून बारावीची परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होईल. करोनाची साथ येण्यापूर्वी ज्याप्रमाणे लेखी परीक्षा होत होत्या त्यानुसारच यंदाच्या परीक्षा होणार आहेत.

 

 

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. गेली दोन वर्षे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्यमंडळ) घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर करोनाच्या साथीमुळे परिणाम झाला. गेल्यावर्षी लेखी परीक्षा पूर्णपणे रद्द करून सरासरी गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची वेळ मंडळावर आली होती. यंदाही डिसेंबर महिन्यापर्यंत मंडळाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमात होते. अखेर शिक्षण विभागाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. यंदा पूर्वीप्रमाणेच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेण्यात येतील, असे गायकवाड यांनी सांगितले.

परीक्षा वेळेवर होणार असल्या तरी यंदा निकाल मात्र काहीसे उशीरा जाहीर करण्यात येणार

आहे. साधारणपणे फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा झाल्यानंतर मे अखेरीस बारावीचा तर जूनमध्ये दहावीचा निकाल जाहीर करण्यात येत असे. यंदा मात्र बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात  येईल.

करोनाच्या साथीमुळे गेल्यावर्षी अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. या कमी करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसारच यंदाच्याही परीक्षा होणार आहेत.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!