जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीकडे या परीक्षांसाठी उमेदवारांना हॉल तिकीट देणे, पेपरची छपाई करणे, परीक्षा घेणे, पेपर जमा करणे, त्यांचं स्कॅनिंग करून त्याद्वारे गुण देऊन निकाल जाहीर करणे अशी सर्व प्रकारची जबाबदारी होती. पण ही कंपनीच गोपनियतेचा भंग करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळं खाजगी कंपन्यांना परीक्षा घेण्याचं कंत्राट देणं किती धोकादायक आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
पुणे,दि.१७( punetoday9news):- टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. (टीईटी परीक्षा घोटाळा) गेल्या महिन्यात प्रदीर्घ काळानंतर घेतलेल्या टीईटी परीक्षेत घोळ झाल्याने अनेक परीक्षार्थींचा जीव टांगणीला लागला आहे. पैसे घेऊन परीक्षा उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून परीक्षा घेणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या संचालकासह सहा जणांना अटक केली होती.या परीक्षेनंतर म्हाडाच परीक्षा घेणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले होते. म्हाडाच्या परीक्षेच्या कामाचे कंत्राट मिळालेल्या ‘जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याचाही समावेश होता
पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रे आणि हॉल तिकिटे सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय होता. त्यादृष्टीने सायबर पोलिसांनी तपास केला. यानंतर पुणे पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे
या कारवाईनंतर खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पहावे लागेल. प्रदीर्घ काळानंतर टीईटी परीक्षा झाल्याने अनेक परीक्षार्थींचे डोळे निकालाकडे लागले होते. मात्र, परीक्षा परिषदेच्या आयुक्तालाच अटक केल्याने निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.म्हाडाची परीक्षा घेण्यासाठी नेमलेली कंत्राटदार कंपनीच पेपरफुटीचा प्रयत्न करीत असल्याची माहिती म्हाडा आणि ‘एमपीएससी’ची तांत्रिक समितीला मिळताच आठ दिवसांपूर्वी म्हाडा पुणे मंडळाने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली.
कंपनीचा संचालक प्रीतिश देशमुख याला भेटण्यासाठी दलाल येणार असल्याची माहिती गुप्तहेरांकरवी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी शनिवारी (ता. ११) रात्री दहा वाजता विश्रांतवाडी येथून प्रीतिश आणि दोन दलालांना अटक केली. रविवारी आणखी दोन दलालांना अटक केली. याप्रकरणी छापे टाकले असता संशयितांच्या घरी टीईटी परीक्षार्थींची ओळखपत्रे आणि हॉल तिकीट मिळाली होती.
विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्यात आले होते. त्या विद्यार्थ्यांना ओएमआर रिकामं ठेवण्यास सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या ओएमआरमध्ये बरोबर उत्तर नोंदवून त्या विद्यार्थ्यांचे निकाल बदलले जात होते.
प्रितेश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत 2020 च्या टीईटी परीक्षेचे सुमारे 40 ते 50 विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे 2021 च्या टीईटी परीक्षेत यातील बरेच विद्यार्थी पात्र असल्याच यादीवरून लक्षात आहे. तपासात हे अपात्र उमेदवार पात्र करण्यासाठी तुकाराम सुपे यांचा सहभाग असल्याचं तपासात उघड झालंय. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 ते 1 लाख रुपये घेतल्याचं समोर आलं आहे.
Comments are closed