शाळांमध्ये स्वच्छता विषयक काळजी घेतली जाते का? पाहण्यासाठी भरारी पथके नेमण्याची गरज.
पिंपरी, दि. १७ ( punetoday9news):- शहरातील शाळा सुरू झाल्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागताच्या फोटो सहित सर्व प्रमुख वर्तमानपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या. मात्र या मध्ये कित्येक शाळांमधून विद्यार्थ्यांचे स्वागत करणाऱ्या शिक्षकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे भयानक वास्तव पहायला मिळाले.
त्यामुळे आता ज्या कारणासाठी शाळा बंद राहिल्या. त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे काय? असा प्रश्न निर्माण झाल्यास काही वावगं ठरू नये. चिमुकल्यांना मोबाईल मधील आभासी जगात राहून शिक्षणाचे धडे घ्यावे लागले. अधिकाधिक वेळ मोबाईलवर व्यतीत करायला लागल्याने डोळ्यांसंबंधित आजार जडले . मोबाईल मधील विडिओ पाहून वर्तनातही काही भयावह बदल पहायला मिळाले. मात्र सर्व प्रयत्न शिक्षणासाठी म्हणून त्याला पर्याय नव्हता. आता शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेसंदर्भात नियमावली जाहीर करत १ली ते ७वी शाळा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
मात्र फोटोत चमकण्यासाठी शिक्षकच विनामास्क दिसून आले. तर काही ठिकाणी अगदी जवळ जवळ विद्यार्थ्यांना उभे करून फोटोसेशन करण्यात आले. जवळपास सर्वच वर्तमानपत्र, वृत्तवाहीन्यांवर हे विदारक चित्र पहायला मिळाले हे शिक्षित समाजाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
इतक्या दिवस विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शाळा बंद राहिल्या आणि सुरू होणाऱ्या पहिल्या दिवशी ज्यांच्यावर विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे असे शिक्षकच बेजबाबदार पणे मास्क काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करत आहेत. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा प्रसार झाला तर त्यास हाच शिक्षित समाज जबाबदार धरायचा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या वर्तमानपत्रांतील वृत्तांनुसार जाहीर पणे कोरोनाचे नियम पायदळी तुडवणाऱ्या शिक्षक व शाळांवर कारवाई होणार का? असेही सुजाण पालक विचारत आहेत.
Comments are closed