मुंबई, दि. 24 (punetoday9news):- अष्टविनायक देवस्थानातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड व पाली या पाच देवस्थानांच्या विकासासाठी सर्वंकष कार्यवाही करण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

दि 11 ते 13 डिसेंबर रोजी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अष्टविनायक देवस्थान आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत या पाच देवस्थानांचा पाहणी दौरा करुन भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी संबंधीत देवस्थानचे व गावातील पदाधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. अष्टविनायक देवस्थानांना जगभरातून अनेक भाविक भेटी देत असतात. कोरोना महामारी कालावधीत या देवस्थानांना भाविकांना भेट देता आली नाही. कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल केल्यानंतर अनेक भाविक अष्टविनायक दर्शनासाठी येत आहेत. भाविकांना आवश्यक सोयीसुविधा आणि त्यांच्या व्यवस्थेसंदर्भात पुणे, अहमदनगर व रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देश दिले असल्याचे उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील मोरगाव देवस्थानच्या आढावा बैठकीत भक्त निवासाची व्यवस्था करावी, अन्नछत्र सुरू करावे. थेऊर देवस्थान मंदिर परिसराबाबत थेऊर फाटा ते थेऊर या रस्त्याची दुरुस्ती व मंदिराजवळील रस्ते दुरुस्ती करावेत, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांना देण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील महड देवस्थानतील सुविधांबाबत झालेल्या बैठकीत महड फाटा ते महड देवस्थान मार्गावर हायमास्ट दिवे लावण्यासाठी उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी पाच लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह बांधावे, तलावाचे सुशोभिकरण करणे, खोपोली ते पाली हा रस्ता दुरुस्त करावा तसेच पाली देवस्थानमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करावे, बायपास रस्ता पूर्ण करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, रायगड यांना देण्यात आले, असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!