दिल्ली, दि. २६( punetoday9news):-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना बूस्टर डोस देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले.

जानेवारीपासून देशाच्या लसीकरण कार्यक्रमाचा विस्तार करून त्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश करण्यात येईल. या किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा प्रारंभ ३ जानेवारीपासून होईल, असे मोदी यांनी नमूद केले. तसेच आरोग्य सेवा आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसह ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

देशात करोना आणि त्याच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री ९.४५ वाजता राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यात त्यांनी ओमायक्रॉनच्या वेगवान संसर्गाबद्दल सतर्कतेच आवाहन नागरिकांना केले. मोदी म्हणाले की जगातील अनेक देशांत ओमायक्रॉनची साथ पसरली असून आपण घाबरून न जाता सतर्क राहण्याची गरज आहे.

करोनाची महासाथ अद्याप संपलेली नसल्याने आपल्याला आणखी खबरदारी घेणे आवश्यक आहे. देशाच्या, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही निरंतर काम केले. तज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाचे टप्पे आणि वयोगट ठरवून मोहीम राबवली. आपल्या लसीकरण मोहीमेला ११ महिने पूर्ण होत असताना आपण लसीकरणाची व्याप्ती वाढवत आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.

Comments are closed

error: Content is protected !!