सिनेस्टाईल चालला थरार.
पिंपरी, दि. २७( punetoday9news):- पिंपळे गुरव मधील काटेपुरम चौकात भर दिवसा एका सराईत गुन्हेगाराचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपींना पकडायला गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलीस पथकावर आरोपींनी दोन गोळ्या झाडल्या. तर स्वक्षणार्थ पोलिसांनाही आरोपींच्या दिशेने दोन राउंड फायरिंग केले.खुनातील आरोपींचा पोलिसांवर गोळीबार; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश किरकोळ जखमी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हा प्रकार रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला आहे.
पोलिसांनी गणेश हनुमंत मोटे, अश्विन आनंदराव चव्हाण, महेश तुकाराम माने या तिघांना अटक केली आहे. योगेश रवींद्र जगताप (36, रा. पिंपळे गुरव) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गणेश बाजीराव ढमाले, अभिजित बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू सपकाळ, अक्षय केंगले, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलू रवी नायर, , निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा दहा गोळ्या झाडून योगेश जगताप नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली होती. मात्र याप्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मोटे आणि अश्विन चव्हाण फरार होते. या दोघांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस आयुक्तालय कामाला लागले होते. गणेश मोटे आणि अश्विन चव्हाणचा शोध घेण्यासाठी सांगवी पोलिसांची तीन पथके, गुंड स्कॉड आणि गुन्हे शाखा युनिट चार तपास करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जगतापच्या खून प्रकरणातील मुख्य गोळीबार करणारे आरोपी गुंड गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश माने यांचा शोध पिंपरी-चिंचवड पोलीस घेत होते. दरम्यान, रात्री अकराच्या सुमारास हे तिघे चाकण परिसरातील कोये येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, हरीश माने हे त्या ठिकाणी गेले होते.
दरम्यान, कोये परिसरातील एका टेकडीवर हे आरोपी लपून बसले होते. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी थेट पोलिसांवर गोळीबार केला आहे. पोलिसांनी देखील चोख प्रतिउत्तर देत गोळीबार केला. ही चकमक अर्धा तास सुरू होती. अखेर आरोपींकडील दोन्ही पिस्तूलातील गोळ्या संपल्या. त्यानंतर, गोळीबार शांत होताच पोलिसांनी लपून बसलेल्या गणेश मोटे, अश्विन चव्हाण आणि महेश मानेला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे किरकोळ जखमी झाले.
Comments are closed