भंडारा डोंगर मंदिरासाठी मिळाले भरीव योगदान.
भंडारा डोंगर येथे सुरु असलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे भव्य बांधकाम सुरु आहे. यासाठी मोठा खर्च अपेक्षित असून निधी स्वरुपात आर्थिक मदतीचे कीर्तनकारांनी नागरीकांना आवाहन केले. कीर्तनकारांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत या महोत्सवाला उपस्थित नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद सढळ हाताने धनादेश स्वरुपात आर्थिक मदत केली. तर अनेकांनी भविष्यात भंडारा देवस्थान ट्रस्टला मदत करण्याचे आश्वासन दिले. विलास कदम, ललीता घाडगे, माउली पाचुंदेकर, अनिल पाटील, उमाकांत तळवडे, प्रशांत जाधव, किशोर आट्टरगेकर, अजीज सिद्धीकी, अण्णा चेडे, रणजित कणकटे, काशिनाथ नेबसकर, अनिस पठाण आदींनी भंडारा डोंगर येथील मंदिरासाठी धनादेश स्वरुपात मदत केली.
पिंपरी,दि. २८( punetoday9news):-
पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान व मराठवाडा जनविकास संघातर्फे आयोजित कीर्तन महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागातील नामवंत कीर्तनकारांनी लहान मुले, युवा वर्गाला सामाजिक संदेश देत सशक्त भारताचा नारा दिला. दरम्यान, भंडारा डोंगर येथे सुरु असलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भव्य बांधकामासाठी विविध क्षेत्रातील नागरीकांनी धनादेश स्वरुपात निधी देत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे आयोजित कीर्तन महोत्सवात राज्याच्या विविध भागातील कीर्तनकरांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रत्येक कीर्तनकारांनी विविध दाखले देत विवेचन केले.
ह.भ.प.विशाल महाराज खोले यांनी आपल्या कीर्तनरुपी सेवेत सांगितले, की माणसांनी स्वल्प संतुष्ट असणे गरजेचे आहे. संतुष्ट होणारे महात्मे असतात. देवाची साधना करणारा भक्त हा देहभान विसरून भक्त झाला पाहिजे. ते निष्ठावंत असावेत. ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी सांगितले, की अगदी लहान मुलांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुले, तसेच तरुण पिढी वाचनाकडे कमालीचे दुर्लक्ष करीत चालली आहे. आपले सण, उत्सव, परंपरा याकडेही दुर्लक्ष होताना दिसते आहे. आपण जीवनात काय कमावले याचा जास्त विचार करणे गरजेचे आहे. युवा कीर्तनकार ह.भ.प. राहुल महाराज पारटे यांनी नाम घेता न लगे कोण, नाममंत्र नाही खोल । दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम ॥ या अभंगावर निरूपण करीत श्रोतृवर्गाला मंत्रमुग्ध केले.
अविनाश महाराज भारती यांनी पशुधन वाचविणे कसे आवश्यक आहे, हे सांगत अगदी पुराण काळापासून गायीचे महत्त्व विशद केले. ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांनी सांगितले, की आपल्या 84 वर्षाच्या काळात केवळ ज्ञानोबा-तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून प्रेरणा मिळाली. दरवर्षी होणार्या पंढरीच्या वारीत कोणताही भेदभाव न करता लाखोंच्या संख्येने वारकरी सहभागी होतात, हीच संतांची मोठी प्रेरणा आहे. तरुणाईने मोबाईलवेड बाजूला ठेवून वाचनाकडे लक्ष द्यावे.
प्रा. डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरी” या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला देत सांगितले, की कोरोनासारख्या महामारीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या माणसापासून रक्ताचे सगेसोयरे दूर गेले, त्यांना माणसाची मदत करता आली नाही; पण तुकोबारायांनी ज्या वृक्षांना आपले सगेसोयरे म्हटले ते आपले सगेसोयरे आजही माणसाच्या मदतीला तत्परतेने धावून येत आहेत. ज्यांना शुद्ध ऑक्सिजनसाठी वृक्षाचे महत्त्व कळाले , तेच तुकोबारायांचे खरे पाईक समजावेत. अरुण पवार यांच्यासारखी माणसे भंडारा डोंगर व अन्य ठिकाणी वृक्षलागवड करून त्यांचे समर्थन करून तुकोबारायांचे विचार सार्थकी लावत आहेत. डॉ. रामकृष्णदास लहवितकर महाराज यांनी विवेचन करताना सांगितले, की मोबाईल वेड हा तरुणाईला व्यसनाधीन बनवत आहे. आज आमच्या संस्थेतील छोटी मुले अभंग, वेद तोंडपाठ आहेत, हा आदर्श घेण्याजोगा आहे. समाजप्रबोधनकार विनोद महाराज रोकडे यांनी सांगितले, की उद्याच्या पिढीला भजन, कीर्तन, रामायण, महाभारत, पारायण काय असते, हे समजण्यासाठी कीर्तन सोहळे काळाची गरज आहे. माणूस संपत्तीने मोठा होऊन चालणार नाही, तर त्याला सांप्रदायिकत्व जपता आले पाहिजे. आज गायीसारखे पशुधन वाचणे गरजेचे आहे, त्यासाठी गोशाळांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.
दरम्यान, कीर्तन महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात कोरोनायोद्धे डॉक्टर, नर्स, सफाई कामगारांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी कीर्तन महोत्सवाचे मुख्य संयोजक विजय (आण्णा) जगताप, माजी महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी सभापती राजू लोखंडे, उद्योजक संजय भिसे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, ह, भ, प, विश्वनाथ वाखारे उद्योजक नाना तांबारे , शंकर तांबे, उमेश लोखंडे, रमेश काकडे, ह , भ, प, जगन्नाथ नाटक पाटील, वामन भरगंडे , भरत शिंगोटे, दत्तात्रय धोंडगे, लक्ष्मण कोरके ह.भ.प. जोपाशेठ पवार, ह.भ.प. बब्रुवान वाघ महाराज, उद्योजक बालाजी पवार, आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. विष्णू शेळके, गोर बंजारा समाज संस्थेचे अध्यक्ष संदीप राठोड, ह.भ.प. अर्जुन शिंदे, कैलास कातळे आदी उपस्थित होते.
Comments are closed