नवी सांगवी, दि. २८( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी परिसरातील साई चौक ते फेमस चौक दरम्यानच्या परिसरातील नागरिकांना मंगळवार (दि.२८) वीजपुरवठा खंडित झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागले. 

स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेला हा भाग सुनियोजित व्यवस्थापनाच्या अभावामुळे अंधाराखाली गेला असल्याची नागरिकांची तक्रार आहे.  आजही पहाटे पाच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास 12 तास वीजपुरवठा खंडित झाला असुन या खंडित वीजपुरवठ्याअभावी गृहिणींना स्वयंपाक तर व्यावसायिकांना वीजेवरील अवलंबून असलेले सर्व कामकाज ठप्प होवून नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यावेळी माहिती घेतली असता साई चौक येथील शितोळे पेट्रोल पंप समोर केबल मध्ये बिघाड झाल्याने या वीजवाहक केबल वर जोडलेल्या पाच ट्रान्सफार्मर वरील वीजपुरवठा खंडित झाला असल्याची बाब समोर आली.  तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून दुरूस्ती चालू असल्याची माहिती मिळाली. मात्र संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याची माहिती महावितरण च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या कामात अधिक वेळ लागण्याचे व वीजपुरवठा खंडित होण्याचे मुख्य धक्कादायक कारण समोर आले ते म्हणजे या केबलच्या वर ड्रेनेज लाइनचे चेंबर बांधण्यात आले आहे. आणि त्या खाली ही वीजपुरवठा करणारी केबल आहे. त्यामुळे वरून चकाचक दिसणाऱ्या रस्त्याखालील कामकाज नियोजनाप्रमाणे खरेच झालेय का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच महानगरपालिका व महावितरण यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसत आहे.  आणि यातूनच अशा प्रकारे वीजपुरवठा खंडित होवून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  स्मार्ट सिटी चे काम होत असताना नियोजित आराखडा  कागदोपत्री व वास्तविकतेत वेगळा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण यापूर्वी कमी खोलीमुळे गॅस गळती होणे.  पाणीपुरवठा लाईन फुटणे. व कित्येक वेळा पालिकेकडून रस्ता खोदाई दरम्यान वीजपुरवठा केबल तुटणे अशा घटना घडल्या आहेत. अगदी या बाबतीत महावितरणने काही महिन्यांपूर्वी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील खंडित वीजपुरवठ्यास महापालिकेचे ठेकेदार जबाबदार असल्याचे जाहीर केले होते.

आता तरी यापुढे स्मार्ट सिटी चे काम होत असताना सुनियोजित काम व्हावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

 

Comments are closed

error: Content is protected !!