पिंपरी, दि. २८( punetoday9news):- पुणे जिल्ह्यातील किल्ले हरिश्चंद्रगड पासून पुर्वेकडे पसरलेल्या बालाघाट रांगेवर सांगनोरे सुळका (आरोहण उंची ७० फुट) आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयाच्या जवळ वसलेल्या सांगनोरे गावच्या पश्चिमेला ७० फुट आरोहण उंची असेलेला सांगनोरे सुळका साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठानच्या आठ गिर्यारोहकांनी यशस्वीपणे सर केला.
यावेळी भगवा ध्वज सुळक्याच्या माथ्यावर प्रस्थापित करून ‘जय भवानी! जय शिवराय!’ या गगनभेदी जयघोषाने परिसरात नवचैतन्य संचारले होते. अवघ्या १५ वर्षाच्या विक्रांत चौधरी याने लीड क्लाइंबिंग केले, तसेच १० वर्षाच्या बाल गिर्यारोहक विराज चौधरी याने सांगनोरे सुळका पादाक्रांत केला.
साह्यकडाचे अनुभवी गिर्यारोहक बाबाजी चौधरी यांच्या नेतृत्वा खाली विलास कुमकर, ॲड. किरण दौंडकर, सागर मांडेकर, अरूण निकम, प्रगती चौधरी, विक्रांत चौधरी आणि बाल गिर्यारोहक विराज चौधरी यांनी मोहिमेत सहभाग घेतला. लीड क्लाइंबिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी आखण्यात आलेली सांगनोरे सुळका आरोहण मोहीम सुरक्षितपणे पार पडली.
साह्यकडा एडवेंचर प्रतिष्ठान, पुणे विषयी बोलताना संस्थापक अध्यक्ष बाबाजी चौधरी म्हणाले, “आमची संस्था साहसी उपक्रमास प्राधान्य देऊन त्यांचे आयोजन करत असते. गेली सहा वर्षे आम्ही कार्यरत आहोत. गडकोटांची अभ्यासपूर्ण भटकंती, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले उत्तुंग सुळके सर करणे, मॅरेथॉन आयोजन करणे तसेच सायकलिंगचे इव्हेंट भरवणे असे कार्य करत असते. हे सर्व करताना ना नफा ना तोटा या तत्वावर कामकाज चालते. आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी गरजू मुलांना मदत, गडकोट संवर्धन, अनाथ मुलांना शैक्षणिक मदत हे समाजसेवी उपक्रम ही राबवत असते.
Comments are closed