पुणे दि.31( punetoday9news):- कृषी विभागामार्फत ३ ते १८ जानेवारी या कालावधीत अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या (पीएफएमई) माध्यमातून “एक जिल्हा एक उत्पादन” (ओडीओपी) या आधारावर राबवली जाते. वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीसाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के कमाल 10 लाख रुपयांपर्यंत अनुदान आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक याकरिता पात्र प्रकल्प खर्चाच्या 35 टक्के अनुदान आहे. याशिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ब्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांसाठीही लाभ देता येणार आहे.
पाच हजाराहून अधिक वैयक्तिक उद्योगांना करणार अर्थसहाय्य.
2021-22 या योजने अंतर्गत भांडवली गुंतवणुकीकरिता 5 हजार 3 वैयक्तिक उद्योगांना अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तसेच 264 स्वयंसहाय्यता गट, 72 शेतकरी उत्पादक कंपन्या व 20 सहकारी संस्थांनाही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
30 डिसेंबर 2021 पर्यंत 6 हजार 188 लाभार्थ्यांनी या योजनेसाठी सहभाग नोंदवला असून त्यापैकी 1 हजार 600 सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत. 1 हजार 250 आराखडे बॅंक कर्ज मंजूरीसाठी विविध बँकेकडे सादर करण्यात आले आहेत. बँकाकडून कर्ज मंजुरीस सुरवात झाली आहे. 120 प्रकल्पांना कर्ज मंजुरी मिळाली आहे.
इच्छुक व्यक्ती व स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आदी गटांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmfme.mofpi.gov.in या एमआयएस पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करावेत. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली आहे. प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
Comments are closed