पुणे, दि. ०३ ( punetoday9news) :- राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त करण्यासाठी मूळ थकबाकीच्या रकमेत तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. यामध्ये येत्या मार्चपर्यंत सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ केली जाणार आहे अशी माहिती महावितरणचे पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी दिली.
खोडद (ता. जुन्नर) येथे कृषी विभाग, महावितरण व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शेतकरी, महसूल व वीजग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिपंप वीजजोडणी धोरणाची सविस्तर माहिती देताना श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे संघटन मंत्री बाळासाहेब औटी, कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे, नायब तहसीलदार सचिन मुढे, सरपंच मनीषा गुळवे, ग्राहक पंचायतीचे रमेश टाकळकर, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना कृषी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वीजबिलांच्या एकूण मूळ थकबाकीमधील व्याज व दंड तसेच महावितरणकडून निर्लेखन अशी रक्कम वगळून वीजबिलांची सुधारित थकबाकी काढण्यात आली आहे. या थकबाकीमधील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. तसेच कृषी ग्राहकांनी भरलेल्या चालू व थकीत वीजबिलांमधील प्रत्येकी ३३ टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह नियमित वीजबिलांचा भरणा करून गावातील व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला हातभार लावावा असे आवाहन अधीक्षक अभियंता पवार यांनी केले. यावेळी बाळासाहेब औटी यांनी देखील मार्गदर्शन केले तर डॉ. संतोष पटनी यांनी महावितरणचा मोबाईल अॅप, वीजसुरक्षेबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झालेले विश्वनाथ फावडे, गंगूबाई सातपुते, रेखा दीक्षित, दत्तात्रय थोरात, शिवाजी थोरात, अशोक काळे या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. या मेळाव्यात जगन्नाथ खोकराळे, उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे, उपसरपंच सविता गायकवाड, शैलेश कुलकर्णी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी आभार मानले.
Comments are closed