रिक्षावाला फोरमच्या आंदोलनाला छावा मराठा संघटनेचा जाहीर पाठिंबा.
पिंपरी, दि. ४( punetoday9news):-
ओला व उबेरसारख्या कंपन्यांनी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. याला आरटीओ आणि सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेत परवानगी दिली आहे. मुळात दुचाकीवरून अशा धोकादायक प्रवासी वाहतुकीला आरटीओ व सरकारने परवानगी दिलीच कशी ? ही परवानगी तात्काळ रद्द करावी, अन्यथा रिक्षाचालक रस्त्यावर उतरल्यावर होणाऱ्या परिणामांना सामोरे जा, असा इशारा छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी दिला.
          विविध फायनान्स कंपन्या व ओला उबेर कंपन्यांमुळे रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. या विरोधात बघतोय रिक्षावाला फोरम तर्फे संविधानिक मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी फोरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांना दिले.
         रामभाऊ जाधव यांनी सांगितले, कोरोना काळातली गंभीर परिस्थिती व सरकारने मोठ्या प्रमाणात रिक्षा परमिट सोडल्याने अगोदरच रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. आता अनेक फायनान्स कंपन्या व ओला उबेर सारख्या कंपन्यांना सरकार दरवेळीप्रमाणे आजही सवलती देत आहे. यामुळे रिक्षाचालकांना मुलांचे शिक्षण, घर चालविणे कठीण झाले आहे. त्यात भर म्हणून ओला, उबेर’सारख्या कंपन्यांनी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. यावर आरटीओ आणि सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेत याला परवानगी दिली आहे. मुळात दुचाकीवरून अशा धोकादायक प्रवासी वाहतुकीला आरटीओ व सरकारने परवानगी दिलीच कशी, असा सवाल आहे. या विरोधात रिक्षावाला फोरम तर्फे संविधानिक पावले उचलली गेली आहेत व असे करणे हीच आजच्या वेळीची नितांत गरज आहे, म्हणून या आंदोलनाला छावा मराठा संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे. तसेच छावा मराठा संघटना रिक्षाचालकांसोबत सोबत आहे.
           दुचाकीवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी व यासाठी आरटीओ तात्काळ योग्य ती दखल घ्यावी व त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही रामभाऊ जाधव यांनी केली.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!