पत्रकारांकडून अपेक्षा करताना, समाजानेही जाणीव ठेवावी-वसंत मुंडे
बीड दि.6 ( punetoday9news):- पत्रकार समाजाची नाडी तर राजकीय नेतृत्व प्रगतीचे हृदय असतात. त्यामुळे लोकशाही टिकवायची असेल तर दोन्ही क्षेत्रात चांगली माणसे उभी राहणे गरजेचे आहे. सर्वच क्षेत्रात काही दोष असले तरी समाजाने चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभे राहणे आवश्यक असुन यासाठी पत्रकारांनीही योगदान द्यावे असे मत माजी आमदार उषाताई दराडे यांनी व्यक्त केले. तर पत्रकारांकडून निर्भिड, निःपक्ष पणाच्या अपेक्षा व्यक्त करताना पत्रकारांच्या अडचणीच्या वेळी समाजानेही जाणीव ठेवावी. वृत्तपत्र व्यवस्था टिकवण्यासाठी पारंपारीक आर्थिक धोरण बदलून निर्णय घ्यावे लागतील असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले.
पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दर्पण दिन सोहळा दर्पणकार पुरस्कार ज्येष्ठ संपादक गुलाब भावसार तर अब्दुल कलाम आदर्श वृत्तपत्र विक्रेते पुरस्कार प्रतापराव सासवडे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
बीड येथे स. मा. गर्गे भवनात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीडच्या वतीने गुरुवार दि. 6 जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सकाळी प्रसिद्ध बासरी वादक अमर डागा यांचे एकतास बासरी वादन झाले. यावेळी बोलतांना माजी आमदार उषाताई दराडे यांनी आपल्या राजकीय जीवनात पत्रकारांचे योगदान मोठे आहे. मला चार मुली असल्या तरी दोन पत्रकारांना माझी मुलेच मानते. स्व.महेश जोशी आणि नागनाथ जाधव यांचा उल्लेख केला. लोकशाहीत वृत्तपत्र आवश्यक आहेत. राजकारणात काही दोष आहेत तसेच वृत्तपत्र क्षेत्रातही असले तरी सर्वच काही वाईट नाही. बदललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत पत्रकारीता आणि राजकारणात चांगली माणसे उभी राहणे आवश्यक आहे. अलीकडे देशात जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने पुन्हा एकदा सर्वांना सावध रहावे लागेल असे आवाहन केले. तर पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकारांच्या वास्तव समस्येवर प्रकाश टाकत छोट्या वृत्तपत्रांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी वृत्तपत्राच्या अंकाची किंमत उत्पादन खर्चावर आधारीत ठेवावी लागेल. वर्षभरात दोनशे दैनिकांनी किंमत दुप्पट केल्यानंतर वाचकांनी त्या स्वीकारल्या आहेत. विक्री किंमतीतून वृत्तपत्रे आत्मनिर्भर झाली तर जाहिरातीवर अवलंबून रहावे लागणार नाही. आणि पत्रकारांना मुक्तपणे लिहिणे शक्य होईल आणि दर्जा सुधारेल असे मत व्यक्त केले. प्रास्तविक वैभव स्वामी यांनी केले. यावेळी संपादक मकदूम काझी, संतोष मानूरकर, महेश वाघमारे, भरत लोळगे, मनिषा तोकले, सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आदिंची उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रात समाजसेवा करणार्यांचाही गौरव करण्यात आला.
सत्कारमूर्ती गहिवरले
यावेळी मनोगत व्यक्त करताना संपादक संपादक गुलाब भावसार यांनी 45 वर्षाच्या पत्रकारीतेत पहिल्यांदाच सन्मान झाला. तर वृत्तपत्र विक्री व्यवसायाच्या 51 वर्षानंतर पत्रकार संघाने दखल घेऊन गौरव केल्याने प्रतापराव सासवडे यांना गहिवरुन आले. गुलाब भावसार यांनी हा क्षण आपल्यासाठी आयुष्यात अवस्मिरणीय असुन यात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगत आनंदाश्रुंना वाट मोकळी करुन दिली.
Comments are closed