पुणे दि.11( punetoday9news):- मकर संक्रांतीचा सण कोविड नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक पद्धतीने व प्लास्टिक मुक्त साजरा करावा आणि वाण देताना आरोग्यपुरक व स्वयंसहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

“माझी वसुंधरा” महत्वाकांक्षी योजनेत वसुंधरा संवर्धनासाठी गावामध्ये पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्रांती साजरी करण्याबाबत या वर्षी संकल्प केला जाणार आहे. मकर संक्रातीला महिला वर्ग एकत्रित येऊन तिळगुळ समारंभ आयोजित करतात. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग एकमेकांना कौटुंबिक जीवनावश्यक व आरोग्यदायी वस्तूंची वाण म्हणून देवाण घेवाण करतात. वाण देताना आरोग्यपुरक व स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी पत्राद्वारे केले आहे.

उमेद अभियान अंतर्गत गावागावात महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात आले आहेत. या सर्व समूहांचा मिळून ग्रामसंघ स्थापन करण्यासाठी “गाव तेथे ग्रामसंघ” असा उपक्रम जिल्हा परिषदने हाती घेतला आहे. या अनुषंगाने आपल्या गावातील समूहात समाविष्ट नसलेल्या महिलांचे समूह स्थापन करण्यात येत आहेत. या समूहाचे प्रत्येक गावात एक असा ग्रामसंघ स्थापन करण्यात येत आहे. प्रत्येक गावात मकर संक्रातीच्या निमित्ताने ग्रामसंघातील महिलांचा एकत्रित तिळगुळ समारंभ साजरा करावा. या वर्षीची मकर संक्राती पर्यावरणपूरक साजरी करताना स्थानिक महिला स्वयंसहाय्यता समूहाद्वारे उत्पादित वस्तूंचा (मास्क, कापडी पिशवी, सेंद्रिय हळद, सेंद्रिय गुळ, तीळ इ.) वापर करावा. या अनोख्या पद्धतीने पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्रात सण साजरा करून या सणाचा गोडवा आणखी द्विगुणीत करावे, असे अवहानदेखील पत्रात करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त मकर संक्राती साजरी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पानसरे यांनी केले आहे.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!