विविध क्षेत्रातील नागरिकांकडून धनादेश स्वरुपात निधी सुपूर्द.
पिंपरी,दि.१५( punetoday9news):- भंडारा डोंगर येथे असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील नागरिकांनी धनादेश स्वरुपात निधी देत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी बोलताना अरुण पवार यांनी या बांधकामासाठी मोठा खर्च अपेक्षित असून, निधी स्वरुपात आर्थिक मदतीचे नागरिकांना आवाहन केले. तसेच मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार व उद्योजक बालाजी पवार बंधूंनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टला पन्नास खुर्च्या भेट स्वरुपात दिल्या.
“वृंदावनी आनंदू रे | विठ्ठलू देव आळविती रे” || या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगावर निरुपण करीत अरुण पवार यांनी गोकुळातील भगवंताच्या विविध लीला अनेक रुपकांमधून, दृष्टातांमधून सांगितल्या. संत तुकाराम महाराजांनी भक्ती, परमार्थ, वैराग्य सांभाळत, जोपासत एवढी मोठी उंची गाठली, तरी महाराजांना देखील आपल्या जीवनात विविध आघात सोसावे लागले. अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु तुकोबारायांची पांडुरंगावरील भक्ती, निष्ठा कधीही कमी झाली नाही. आपल्याही जीवनात, संसारात प्रसंगी येणारे आघात सोसा, संकटे सोसत, धीरोदत्तपणे संकटांना सामोरे जा. कारण मरेपर्यंत संसारात संकटे सोडीत नसतात, म्हणूनच भक्तिमय मार्गाने संसार करा, शुद्ध भाव ठेवा, व्यसने करू नका, कोणाचाही मत्सर करू नका. संतांवर, देव, भक्तांवर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही अरुण पवार यांनी सांगितले.
यावेळी उद्योजक शंकर भाऊ तांबे, विठ्ठल झिंजुर्डे, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष विजूआण्णा जगताप, भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त ह.भ.प. जग्गनाथ पाटील, ह.भ. प. जोपाशेट पवार ह.भ.प. बाळासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कोळी, दत्तात्रय सोनवणे, उद्योजक संजय आटोळे आदी उपस्थित होते.
Comments are closed