भोसरी, दि. २२( punetoday9news):- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन तर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त भोसरीतील चक्रपाणी वसाहतीतील महादेवनगर मधील राजेंद्र चौधरी व जितेंद्र चौधरी यांच्या घराचा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक पद्धतीने गृहप्रवेश सोहळा पार पडला .
सर्वप्रथम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास रुपाली चौधरी, जितेंद्र चौधरी यांनी तर ज्योती महाजन, नकुल महाजन यांचे हस्ते छत्रपती शिवाजी , छत्रपती संभाजी महाराज , डॉ .बाबासाहेब आंबेडकर , संत शिरोमणी सावता महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान , महात्मा फुले समग्र वाड्मय यांचे पूजन करून करण्यात आली.
यावेळी सत्यशोधक रघुनाथ ढोक म्हणाले कि कर्मकांडाला तिलांजली देत बहुजनांनी आपल्या घरातील सर्व कार्य सत्यशोधक पद्धतीने पार पाडावेत. या आधुनिक काळात जग पुर्ण विज्ञान निष्ठ असताना देखील पूजा पाठ , होमहवन केल्याशिवाय, गृहप्रवेश करू नये ही भीती बहुजनांनी सोडून दिली पाहिजे . आज चौधरी कुटुंबाने महापुरुषांचे विचाराने नवीन पिढीला आदर्श दिला हे देखील महत्वाचे आहे. शिवकाळात महाराजांनी अनेक गड जिकंले काही वेळेस अमावस्या असताना देखील लढाई, मोहीम राबवून यश मिळविले पण कोठे पुजा घातल्याचे ऐकिवात नाही परंतु पेशवाई लयास गेल्यानंतर अनेक प्रकारे भटजी पुजापाठ करून बहुजनांची आर्थिक पिळवणूक करू लागले. याला पायबंध घालण्यासाठी महात्मा फुले यांनी १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून समाज प्रबोधन केले आहे. पुढे ढोक असेही म्हणाले की या कोव्हीडच्या काळात आर्थिक उधळपट्टी न करता कमी लोकात सर्व कार्यक्रम करावेत या साठी सत्यशोधक पर्याय महत्वाचा आहे असे देखील म्हंटले.
सत्यशोधक रोहिदास तोडकर यांनी सत्यशोधक समाजाची मिमांसा करतांना घरासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या कामगार बंधुचा यथोचित सन्मान करा आणि सत्य काय आहे याचा आपण शोध घ्या. अंधश्रद्धा, कर्मकांड याला मूठमाती देत कार्य पार पाडावे असे म्हंटले.
खानदेश माळी मंडळाचे सचिव नकुल महाजन, सत्यशोधक योगेश गाडगे यांचे हस्ते चौधरी कुटुंबाला राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्यशोधक गृहप्रवेश केला म्हणून सन्मान पत्र व फुले,शाहु,आंबेडकर प्रतिमा भेट देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक ढोक यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करत पुजा विधी संपन्न करीत सत्याचा अखंड व सत्यशोधक आरती म्हंटली. तर रोहिदास तोडकर यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केला. यावेळी घरासाठी ज्यांनी मदत केली त्या कामगारांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. तर शेवटी नकुल महाजन यांनी आभार मानले .
यावेळी कार्यक्रमाला सत्यशोधक लहू अनारसे, कैलास माळी, शिवाजी महाजन, एकनाथ जाधव, ज्ञानेश्वर बोरसे, विनोद माळी, मच्छिंद्र महाजन, गणेश महाजन, चंद्रशेखर महाजन, वैशाली महाजन, कोमल महाजन, किरण महाजन उपस्थित होते.
Comments are closed