पुणे,दि. २३( punetoday9news):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी, तर बारावीची आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्य मंडळाकडून पूर्वीच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल, बारावीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा ४ ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. त्यानंतर आता प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च, तर बारावीची आणि व्यवसाय अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ठरवलेल्या मुदतीत देऊन विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना राज्य मंडळाकडून विभागीय मंडळांच्या सचिवांना देण्यात आल्या आहेत.
Comments are closed