मुंबई २३( punetoday9news):- आठवेळच्या विजेत्या बलाढ्य चीनने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत आपली विजयी वाटचाल कायम राखताना इराण संघाचा ७-० गोलने धुव्वा उडवला. अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात चीनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला.

वाँग शाँगने पुन्हा एकदा आपला दर्जेदार खेळ सादर करताना संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. वाँग शाँग आणि वाँग शानशान यांच्या शानदार खेळाच्या जोरावर संभाव्य विजेते असलेल्या चीनने दिमाखात बाद फेरीतील स्थान निश्चित केले. चीनविरुद्धच्या या पराभवानंतर बाद फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी इराणला बुधवारी चायनिज तैपईविरुद्ध विजय अनिवार्य झाला आहे. तैपईलाही पुढील फेरीसाठी विजय आवश्यक असल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे. गुरुवारी चीनला तैपईविरुद्ध ४-० गोल असा विजय मिळवताना काहीसे झुंजावे लागले, मात्र रविवारी त्यांनी पुन्हा एकदा वेगवान आणि नियंत्रित खेळ करताना इराणचा भक्कम बचाव भेदत शानदार पुनरागमन केले.

दहाव्याच मिनिटाला वाँग शाँगने मारलेली किक इराणची गोलकीपर झोहरेह कौदैईने यशस्वीपणे रोखला. यानंतर इराणच्या या स्टार गोलकीपरने पाचच मिनिटांनी पुन्हा एकदा चीनच्या कर्णधाराला गोल करण्यापासून रोखले. तिने भारताविरुद्ध केलेला भक्कम बचाव चीनविरुद्धही कायम राखत प्रभावी कामगिरी केली.

त्यामुळेच इराणच्या या गोलकीपरचा बचाव भेदण्यासाठी चीनला वेगळी योजना आखावी लागली आणि ही विशेष कामगिरी केली ती वाँग शाँगने. तिने २८व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडू जाळ्याच्या अचूक वेध घेत मरून अप्रतिम गोल केला. यासह शाँगने दिमाखात आपल्या २७व्या वाढदिवसाचा जल्लोष केला. या गोलनंतर इराणने विचलित न होता पुन्हा एकदा भक्कम बचाव करत चीनला गोलजाळ्यापासून दूर राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चीनच्या वेगवान आणि आक्रमक खेळापुढे मध्यंतराच्या काही मिनिटांआधीच इराणला दुसरा गोल स्वीकारावा लागला. झिआओ युयी हिने ४३व्या मिनीटाला गोल करत चीनला मध्यंतराला २-० गोल असे आघाडीवर नेले.

इराणने मध्यंतरानंतर नेगिन झंडी या आपल्या गुणवान युवा खेळाडूला मैदानात उतरविले. मात्र, काही मिनिटांनीच मेलिका मोटेवलीने चीनच्या ली मेंगवेनला फाऊल केले आणि इराणला पेनल्टीला सामोरे जावे लागले. या नामी संधीचा फायदा घेत वाँग शाँगने सहजपणे गोलकीपर कौदेईचा बचाव भेदला आणि ४९व्या मिनीटाला चीनची आघाडी ३-० गोल अशी केली.

चीनच्या वर्चस्वानंतर सुरुवातीला सामन्यात जी चुरस पाहण्यास मिळाली होती, ती काहीशी लुप्त झाली होती. चीनची ही आघाडी पुढे नेली ती वाँग शानशानने. तिने ५५व्या मिनिटाला झिआओ युयीकडून मिळालेल्या पासवर गोल केला. यानंतर चार मिनिटांनी पुन्हा एकदा या जोडीने अप्रतिम चाल रचत संघाचा पाचवा गोल नोंदवला. शानशानने पाठोपाठ दोन गोल नोंदवत इराणच्या आव्हानातली हवाच काढली.

दुसऱ्या सत्रात चीनच्या खेळाडूंची तंदुरुस्ती आणि खेळातील तंत्र दिसून आले. या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर चीनने ७७व्या मिनिटाला सहावा गोल केला. टँग जिआलीने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरल्यानंतर केवळ १५ मिनिटांनीच गोल करत संघाला ६-० गोल असे आघाडीवर नेले. चीनच्या आक्रमक खेळा पुढे इरानच्या खेळाडू दडपनाखाली आल्या. ८२ व्या मिनिटाला चीनच्या वॉँग शॉँगने हेडरने संघाचा सातवा गोल केला. चीन संघाने ७-० गोलची आघाडी अखेरपर्यंत कायम राखत दिमाखात आगेकूच केली.

चीनने या स्पर्धेवर एकहाती दबदबा राखताना १९८६ ते १९९९ दरम्यान सलग सात विजेतेपद पटकावली आहेत. पण २००६ साली ऑस्ट्रेलिया येथे आठवे जेतेपद पटकावल्यानंतर चीनला एकदाही या स्पधेर्चे विजेतेपद उंचावता आलेले नाही.

 

Comments are closed

error: Content is protected !!