दिल्ली,दि.२८( punetoday9news):- महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर पृथ्वी पाटील एनसीसीच्या एअर फोर्स विंगची सर्वोत्तम कॅडेट (बेस्ट कॅडेट) ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे दोन्ही बहुमान आज महाराष्ट्राला प्रदान करण्यात आले.
येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या लष्कर,नौदल आणि वायुदलातील प्रत्येकी एक मुलगा व मुलगी अशा बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा कॅडेट कॅप्टन निकिता खोत आणि महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी तर सिनियर अंडर ऑफिसर सिध्देश जाधव यांनी प्रधानमंत्री बॅनर स्वीकारले. देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 20२० ते नोव्हेंबर 20२१ मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर दिल्ली एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण १७ वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मागील वर्षी महाराष्ट्र हा प्रधानमंत्री बॅनरचा उपविजेता ठरला होता तर राज्याला जवळपास तब्बल सात वर्षाने हा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाल्याने या बहुमानाचे विशेष महत्व आहे.
Comments are closed