अमरावती,दि.३(punetoday9news):- कोरोना प्रादुर्भाव व भीती प्रचंड पसरलेल्या सुरुवातीच्या काळात ( जुलै 2020) घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
प्रमुख राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर बुधवारी( दि.२) अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात आपला निर्णय देऊन आरोपीला शिक्षा ठोठावली.
त्यावेळी अमरावती शहरातील एका मॉलमध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली होती. बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी लॅब मधील कर्मचारी अलकेश देशमुख याने एका युवती कर्मचाऱ्याच्या चक्क गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सदर महिलेने ही बाब आपल्या भावाला सांगितली असता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात याबाबत चौकशी केली तेव्हा स्वॅब घेण्याची अशी कुठलीही पद्धत नसल्याचे समजताच संबंधित युवतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या बडनेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर आरोपी अलकेश देशमुख विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मागील दीड वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. न्यायाधीश व्हि. एस.गायकी यांनी आपला निर्णय देतांना आरोपी अलकेश याला दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
Comments are closed