पुणे दि.3( punetoday9news):- बारावी विज्ञान शाखेत व पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत असलेल्या २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह 31 मार्च 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी संतोष जाधव यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्राकरिता अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा.
महाविद्यालयाचे शिफारस पत्र, 15 A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षांचे बोनाफाईड प्रमाणपत्र जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार किंवा पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे.
ऑनलाईन फॉर्ममध्ये जातीच्या दाखल्याचा जो तपशील भरला जातो त्यानुसारच जात वैधता प्रमाणपत्राची ऑनलाईन प्रणालीमध्ये निर्मिती होते. त्यामुळे जातीच्या दाखल्यावरील तपशील व ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी दिलेली माहिती सारखीच असल्याची खात्री अर्जदाराने करावी, असे आवाहनही जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments are closed