शिवभोजन केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यासाठी एक महिन्यांची मुदतवाढ – छगन भुजबळ
मुंबई, दि.१० (punetoday9news):- शिवभोजन केंद्रांबाबतच्या तक्रारी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्या शिवभोजन केंद्रांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
मंत्रालयातील दालनात शिवभोजन थाळी योजनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा विभागाचे सचिव विजय वाघमारे, सहसचिव सुधीर तुंगार, सहसचिव चारुशीला तांबेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अन्न, नागरी पुरवठा मंत्री भुजबळ म्हणाले, शिवभोजन थाळीची गुणवत्ता तपासणीसाठी अधिकाऱ्यांची पथके तयार करा. शिवभोजनच्या गुणवत्ते मध्ये कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असे देखील भुजबळ म्हणाले.
शिवभोजन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजित आहे. या कामासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत होती मात्र प्रत्येक शिवभोजन केंद्रचालकांकडून या कामाला थोडा अवधी वाढवून मिळावा अशी मागणी होती. हे लक्षात घेता प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी एक महिन्याचा अवधी वाढवून देण्यात आला आहे. अशी माहिती देखील भुजबळ यांनी दिली.
शिवभोजन केंद्र चालकांना शिवभोजन थाळीचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो एका अँप्लिकेशनमध्ये अपलोड करण्याचा नियम आहे. मात्र या प्रणालीचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे येथून पुढे हे फोटो अपलोड करण्यासाठी शिवभोजन केंद्रापासून १०० मिटर ही मर्यादा आखून दिलेली आहे. त्यामुळे शिवभोजन चालकाला १०० मीटरच्या आत म्हणजेच शिवभोजन केंद्रावर उपस्थित राहूनच फोटो अपलोड करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून,राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ दहा रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने शिवभोजन ही योजना २६ जानेवारी २०२० सुरु करण्यात आली.आतापर्यंत 9 फेब्रुवारी २०२२ पर्यंत सुमारे ८ कोटी ३४ लाख ९५ हजार ८५७ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.अल्पकालावधीत ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली आहे.सध्या राज्यात १५२१ शिवभोजन केंद्र आहेत. टाळेबंदीच्या कालावधीत अडीच कोटी शिवभोजन थाळयांचे मोफत वितरण करण्यात आले आहे.या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक शिवभोजन केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात यावे अशा सूचनाही भुजबळ यांनी दिल्या.
Comments are closed