उद्यानाचे लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावे, अशी महापालिका आयुक्तांकडे केली मागणी .
अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करू.
पिंपरी, १०( punetoday9news) :- पिंपळे गुरवमधील 8 टु 80 उद्यानाचे 75 तासात काम पूर्ण करून त्याचे लोकार्पण केले. तसे पिंपळे गुरवमधीलच राजमाता जिजाऊ उद्यानाचे नूतनीकरणाच्या कामाला उशीर का होत आहे, याबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा करण्यात यावी. तसेच या उद्यानाचे लवकरात लवकर लोकार्पण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेने उद्यानाचे तात्काळ लोकार्पण न केल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्यानाचे लोकार्पण करण्याचा इशाराही राजेंद्र जगताप यांनी दिला आहे.
राजेंद्र जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे, की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पिंपळे गुरवमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान साकारण्यात आले. 2012 साली आपल्या नगरसेवकपदाच्या काळात हे उद्यान दुबईच्या धर्तीवर मिरॅकल उद्यान म्हणून विकसित करण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला व महापालिकेच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपये मंजूर करून नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आले. तत्कालीन महापौर शकुंतला धराडे व आपण पाठपुरावा करून हे काम अठरा महिन्यात पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाशी पाठपुरावा केला. पण 2017 मध्ये महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची सत्ता आली आणि उद्यानाचे काम बारगळले. या उद्यानाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जाणीवपूर्वक दिरंगाई करून नूतनीकरणाच्या कामाची रक्कम वाढवून घेण्यात आली.
विशेष म्हणजे स्मार्ट सिटी कार्यक्रमांतर्गत प्रशासनाच्या वतीने 8 टु 80 या उद्यानाचे अवघ्या 76 तासात काम करून त्याचे लोकार्पणही केले. या उद्यानाची संकल्पना चांगली आहे. परंतु आपल्या कार्यकाळात नूतनीकरणाचे काम चालू करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ उद्यानाचे काम रखडवून जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत आहे. याचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला जाऊ नये, या उद्देशानेच या उद्यानाचे काम पूर्ण केले जात नाही. केवळ अठरा महिन्यांची मुदत असताना हे काम अद्याप पूर्ण का झाले नाही ? याची चौकशी करण्यात यावी. महापालिकेतील अधिकारी भाजप नेत्यांच्या दबावाखाली काम करून राजमाता जिजाऊ उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नागरीकांच्या कररुपी पैशाचा अपव्यय करीत आहेत, असेही राजेंद्र जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed