पिंपरी, दि. १२( punetoday9news):-  थेरगाव येथील महापालिकेच्या पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या चार खेळाडूंची रणजी स्पर्धेच्या २०२२ मोसमाकरिता महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली आहे. या खेळाडूंचे महापौर माई ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांनी अभिनंदन केले असून पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 या निवडीमुळे शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना निश्चितपणे प्रेरणा मिळणार असून या नगरीला क्रीडानगरी म्हणून मिळत असलेल्या नावलौकिकात भर पडली आहे. ही शहरासाठी भुषणावह बाब असून मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजवावी, असे महापौर माई ढोरे यावेळी म्हणाल्या.

निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ऋतुराज गायकवाड, विशाल गीते, पवन शाह आणि विकी ओस्तवाल या खेळाडूंचा सहभाग आहे. ऋतुराज गायकवाड हा भारतीय संघातही समाविष्ट असून आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सर्वाधिक धावा करून त्याने ऑरेंज कॅप पटकावली आहे. विकी ओस्तवाल ह्याने नुकताच पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत संघाला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. तसेच पवन शहा याने १९ वर्षाखालील भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला आशियाई स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले आहे, त्याचप्रमाणे १९ वर्षाखालील कसोटी सामन्यात श्रीलंकेत संघाविरुद्ध २८२ धावांची विक्रमी खेळी केली आहे. तर विशाल गीते हा वेगवान गोलंदाज असून त्याने यापुर्वीही रणजी करंडक व मुश्ताक अली स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.



विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी खेळाडूंना दर्जेदार आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. थेरगाव येथे महापालिकेने क्रिकेटसाठी मैदान विकसित केले असून त्याठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोई आणि सुविधा आहेत. सध्या वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने नवोदित खेळाडूंना याठिकाणी क्रिकेटचे प्रशिक्षण दिले जात आहे. या अकॅडमीमधील एकाच वेळी चार खेळाडूंची महाराष्ट्र रणजी संघात निवड झाल्याने शहराच्या क्रीडाक्षेत्राचा बहुमान उंचावला असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले.
थेरगाव येथील अकॅडमी मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक मोहन जाधव, शादाब शेख, चंदन गंगावणे, भूषण सूर्यवंशी आणि फिटनेस ट्रेनर डॉ.विजय पाटील यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे सर्व खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करण्यात यशस्वी होत आहेत, त्यांचेही महापौर माई ढोरे यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, क्रीडा समितीचे सभापती उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनीही या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

#

Comments are closed

error: Content is protected !!