पिंपरी, दि. २१( punetoday9news):- स्वराज्यातील रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी व्यापक योजना आखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे थोर कल्याणकारी राजे होते,भान राखून योजना आखायच्या आणि बेभान होऊन त्या पूर्णत्वास न्यायच्या असे महाराजांचे वैशिष्ट्य होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधनपर्वाच्या तीन दिवसांच्या ऑनलाईन कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी ते बोलत होते.
यावेळी महापौर माई ढोरे,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसदस्य मारूती भापकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक,वंचित बहुजन आघाडीचे संतोष जोगदंड
भक्ती शक्ती उत्सव समितीचे जीवन बोराडे, सागर तापकीर, धनाजी येळकर,अभिषेक म्हसे, सतीश काळे,दादासाहेब पाटील, हेमंत शिर्के,प्रतिक इंगळे आदी उपस्थित होते.
बानगुडे पाटील म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अवघ्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी प्रत्येक घटनेचे नियोजन केले होते. समुद्रातील भक्कम किल्ले त्यांच्या स्थापत्य विषयक बुद्धिमत्तेचा आजही परिचय करून देतात. अल्पावधीत शेकडो मजबूत किल्यांची निर्मिती केली. शिवरायांचे गड अत्यंत मजबूत , संरक्षण सिद्ध आणि धान्याची कोठार, पाण्याची सोय आणि बाजारपेठांनी सुसज्ज असायचे,या किल्ल्यांचा अभ्यास आजही देशविदेशातील स्थापत्य तज्ञ करतात असे सांगून छत्रपती शिवाजी महाराजांकडे मोहिमा असो की लढाई ती जिंकायचीच असा प्रगढ आत्मविश्वास होता असेही बानगुडे पाटील म्हणाले.
त्यानंतर अरुणोदय प्राॅडक्शन निर्मित प्रविण देशमुख आणि गणेश कोतवाल दिग्दर्शीत सुमारे ८० कलाकारांनी भव्य दिव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा स्टेजवर सादर करून ऐतिहासिक स्मृतिंना उजाळा दिला. महाराजांचे बालपण ते राज्याभिषेकापर्यंतचे सर्व महत्वाचे क्षण मंचावर सादर केले.
शिवशाहीर राजेश कडूसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडे सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन बोराडे यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी उपस्थित तसेच ऑनलाईन उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Comments are closed