बाणेर, दि. २१( punetoday9news):- निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही आमच्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तुमचे कपडे मळलेले पाहिजेत. तुमच्या कपड्याला घामाचा घाण वास आला पाहिजे. हातात भाकरीचा तुकडा ठेवला तर तो गिळायची सवय पाहिजे. निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फकीर असलं पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं,” असे परखड मत नाना पाटेकरांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा नेते गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
पक्ष बदलणाऱ्याला पाच वर्ष कोणतेही पद देऊ नका, एकही माणूस पक्ष बदलणार नाही. पण आमच्याकडे तसे नियमच नाहीत. दरवर्षी मी निवडणुकीत निवडून आलो, आमदार, मंत्री झाल्यानंतर पुढील वर्षी माझी संपत्ती किती हे दिसायलाच पाहिजे. निवडून येण्याआधी ५० आणि नंतर १५० किलो वजन का झालं? हा प्रश्न नागरिकांनी विचारायलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.
तुम्ही वेगवेगळ्या पक्षातील चांगल्या लोकांनी एकत्र या आणि एक वेगळा पक्ष स्थापन करा असा सल्ला नाना पाटेकरांनी देताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आम्ही मत दिलं असून फक्त आम्हाला कोणत्या गोष्टीसाठी याचना करावी लागू नये याची काळजी घ्या असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
Comments are closed