पिंपरी,दि. २३( punetoday9news):-
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश महासचिवपदी उषाताई इंगोले पाटील यांची निवड झाल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा विद्यार्थी समिती यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, मराठवाडा विद्यार्थी समितीचे डाॕ. मारुती अवरगंड, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, उमा पाडुळे, छाया अवरगंड यांच्या हस्ते इंगोले पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बळीराम माळी, संतोष पाटील, प्रशांत फड, संतोष जायभाय आदी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले, की पिंपरी-चिंचवड शहरात महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी उषाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हक्काचे व्यासपीठ उभे करुन महिला सबलीकरण करण्याचे काम करण्यात येईल.
डाॕ. मारुती अवरगंड यांनी सांगितले, की नवीन पिढीवर चांगले विचार बिंबविण्यासाठी येणाऱ्या काळात जिजाऊ बालसंस्कार वर्ग चालविणे काळाची गरज आहे. हे कार्य जिजाऊ ब्रिगेड प्रभावीपणे करु शकते.
उषाताई पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, की जिजाऊ ब्रिगेड ही राजमाता जिजाऊ यांच्या विचाराने चालते. त्यामुळे सर्व धर्म व जातीतील महिलांसाठी आम्ही काम करत असतो. ज्या महिला संघर्ष करुन आपले व्यवसाय उभे करतात, त्यांना मदत करणे आमचे प्रमुख कार्य असेल. जिथे महिलांवर अन्याय होईल, तिथे आम्ही संघटितपणे त्याचा प्रतिकार करणार आहोत. मराठवाडा जनविकास संघ एक महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ उभा करेल, त्याला मार्गदर्शन करण्याचे काम जिजाऊ ब्रिगेड करण्यास बांधील आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाडुळे यांनी, तर प्रशांत फड यांनी आभार मानले.
_____________________________________
Comments are closed