पुणे दि.२३ ( punetoday9news):- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे १ मार्च रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेसाठी भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वय ठेवत नियोजन करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा नियोजनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे, आंबेगावचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, आंबेगावच्या तहलिसदार रमा जोशी, खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, उपअभियंता एस.एस. पटाडे, पोलीस निरीक्षक सतिश गुरव, किशोर वागज यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.
२६ व २७ फेब्रुवारी रोजी शनिवार, रविवार सुट्टी आहे १ मार्च रोजी महाशिवरात्र होणार आहे. सलग सुट्ट्या आल्या असल्याने भीमाशंकर यात्रेला मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी प्रत्येक विभागात समन्वय असावा. सर्व विभागांचा समन्वयासाठी नियंत्रण कक्ष असणार आहे. नियंत्रण कक्षामुळे नियोजन सुलभ होईल, असेही खराडे म्हणाले.
बैठकीत पार्कींग व क्रेन सुविधा, मिनी बसेस व खाजगी वाहन सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा, आरोग्य आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक विक्रेते, उत्पादने यांच्यासाठी सुविधा, वीज व्यवस्था, वनविभागाशी सबंधित सुविधा, रस्ते विकास, एसटी नियोजन, पोलीस यंत्रणा तसेच दर्शन व्यवस्था व यात्रा नियोजन आदी सुविधांचा आढावा घेतला.
उपविभागीय अधिकारी कोडलकर, चव्हाण व तहसीलदार जोशी यांनी यात्रा नियोजनाबाबत सादरीकरण केले. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments are closed