मुंबई, दि. १५( punetoday9news):- एकाहून एक भन्नाट अशा मनोरंजनाची मेजवानी घेऊन मराठी टेलिव्हिजन विश्वात “क्यू मराठी” ही नवीन वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही देशातील पहिली अशी वाहिनी असणार आहे, ज्यात कलाकारांचा संच आणि त्यांच्या गोष्टींचा खजिना हा राज्यातील सगळ्यात लोकप्रिय आणि भन्नाट अशा डिजिटल क्रिएटर्सने तयार केलेला असणार आहे.
मराठी डिजिटल विश्वातल्या भन्नाट गोष्टी प्रेक्षकांना पहिल्यांदाच टीव्हीवर पहायला मिळणार आहे, हिच या वाहिनीची जमेची बाजू आहे. क्यू यु मिडिया कंपनीची ”द क्यू” ह्या हिंदी वाहिनी नंतर प्रादेशिक भाषेतली ही पहिलीच वाहिनी असून ‘क्यू मराठी’ ही वाहिनी आज पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
क्यू मराठी, फ्री-टू-एअर चॅनल लॉन्च केल्याने क्यू यु मीडियाचा हिंदी भाषिक बाजाराच्या पलीकडे प्रादेशिक बाजारपेठांमध्ये विस्तार झाला आहे. नेटवर्कच्या मूळ डीएनएला बळकटी देत, क्यू मराठी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर आघाडीच्या मराठी डिजिटल निर्मात्यांकडून कलाकृतीचे मनोरंजक मिश्रण प्रदर्शित करण्यासाठी क्युरेट करेल.
गेल्या दहा वर्षांत मनोरंजनाची परिभाषा बदलल्याने टेलिव्हिजन विश्वात देखील खूप बदल घडले आहेत. प्रेक्षकांची बदलणारी अभिरुची लक्षात घेऊनच ‘क्यू मराठी’ ने प्रेक्षकांच्या पसंतीचे फक्त डिजिटल विश्वातले स्टार्स आणले नाहीत तर मनोरंजन विश्वातील बडे स्टार्स देखील टीव्हीवर आणण्याचे ठरवले. यात तरुणाईला आकर्षित करत ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रकारच्या आशयांच्या कार्यक्रमांची मेजवाणी यात असणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘क्यू मराठी’च्या चॅनल हेड ‘नीता ठाकरे’ सांगतात की,’“आमच्या वाहिनीवर प्रक्षेपित होणारे सगळे कार्यक्रम हे लक्षवेधी आणि विविध धाटणीचे असून ते संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करतील याची मला खात्री आहे. शिवाय डिजिटल विश्वातल्या भन्नाट क्रिएटर्सच्या प्रेक्षकांमध्ये आता टीव्हीच्या प्रेक्षाकवर्गाची भर पडणार आहे.”
वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड “आशुतोष बर्वे” सांगतात की, “मराठी टेलिव्हिजन विश्वात आता नव्या पर्वाची सुरुवात होत आहे, कारण क्यू मराठी प्रथमच डिजिटल विश्वातले सगळ्यात लोकप्रिय, सगळ्यात जास्त प्रेक्षकवर्ग असलेले, लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले, उत्कृष्ट आणि दर्जेदार डिजिटल स्टार्स आणि त्यांच्या गोष्टी मराठी वाहिनीवर आणत आहे.”
अशा ‘भन्नाट’ कार्यक्रमांसाठी देशभरातील संपूर्ण मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘क्यू मराठी’ ही वाहिनी १५ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
_____________________________________
Comments are closed