पुणे,४ ( punetoday9news):- पर्यायी इंधनावरील चार दिवसीय परिषद व प्रदर्शनीला येथील सिंचन मैदानात शनिवारी (दि. २) प्रारंभ झाला. भारतातील सर्वात मोठ्या या परिषदेमध्ये महावितरणच्या इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्सवर आधारित प्रदर्शनीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना ईव्ही चार्जिंग स्टेशन्स तसेच नवीन वीजजोडणीची प्रक्रिया आदींची सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
महावितरणच्या या प्रदर्शनीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांना महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी महावितरणकडून ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी घेतलेला पुढाकार तसेच चार्जिंग स्टेशन्सला तात्काळ नवीन वीजजोडणी देण्याच्या सुलभ प्रक्रियेची माहिती दिली. राज्यात नवीन ५० इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी ११ कोटी ७३ लाख रुपये प्रस्तावित खर्चाच्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर व अमरावती येथे चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील अशी माहिती संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी दिली. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक (प्र.) किशोर परदेशी, प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, सतीश राजदीप आदींची उपस्थिती होती.
महावितरणची ही प्रदर्शनी दि. ५ एप्रिलपर्यंत राहणार आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे आधुनिक तंत्रज्ञान, चार्जिंग स्टेशन्ससाठी नवीन वीजजोडणीच्या सुलभ प्रक्रियेची सविस्त माहिती, वीजदर आदींची माहिती देण्यात येत आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता शरद बंड व आरती कुलकर्णी (मुख्यालय) तसेच सर्वश्री विरेंद्र जसमतीया, महेश पाटील, सुहास कालेबाग, दिनेश लडकत, संतोष पटनी, कपिल शिंदे, राहुल फाये, स्वप्निल जाधव, संदीप जाधव हे अभियंते व अधिकारी प्रदर्शनीद्वारे नागरिकांना माहिती उपलब्ध करून देत आहेत.
Comments are closed