मुंबई, दि ७( punetoday9news):- महाराष्ट्र राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस एनटीपीसी लि. सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंतचे अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करण्याकरीता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (किंवा त्यांचे सहाय्यक/ सहयोगी कंपनी) व महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) यांच्या दरम्यान अनुक्रमे 50:50 या प्रमाणात भांडवली गुंतवणूक राहील.
ही संयुक्त उद्यम कंपनी राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौर ऊर्जा पार्क विकसित करेल. त्यासाठी राज्य शासनाच्या ऊर्जा विभागास राज्य सुकाणू अभिकरण (State Nodal Agency) म्हणून घोषित करण्यात आले.
या समितीवर राज्य शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. सौर ऊर्जा पार्कमधील प्रकल्पधारकाकडून एक रकमी शुल्क व वार्षिक संचलन व देखभाल शुल्क इ. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुज्ञेय करण्यात आले आहे
अपारंपरिक ऊर्जासाठी 17360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025 पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 12930 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. राज्यात सध्या 9305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2123 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.
Comments are closed