● कोरोना व लाॅकडाउन मुळे दोन वर्षे शाळा व सुट्टी यात आलेला विस्कळीत पणा आता सुरळीत होणार.
● शासनाच्या परिपत्रकाद्वारे पूर्वीप्रमाणेच २ मे पासून सूट्टी जाहीर करण्यात आली असून १५ जून ऐवजी १३ जून पासून शाळा सुरू होतील.
मुंबई,दि.१२( punetoday9news):- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे
सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती . त्यानुसार याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे .
या निर्णयानुसार सोमवार २ मे , २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे . सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि . १२ जून , २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि . १३ जून , २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील . तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि . २७ जून , २०२२ रोजी सुरू होतील .
इयत्ता पहिली ते नववी व ११ वी चा निकाल दि. ३० एप्रिल २०२२ रोजी अथवा त्यानंतर सुट्टीच्या कालावधीत लावता येईल .
तथापि तो निकाल विद्यार्थी , पालकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी संबंधीत शाळेची राहील. शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अथवा नाताळ यासारख्या सणांच्याप्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) यांच्या परवानगीने घेता येईल . तथापि , माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्या ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत , याची दक्षता घेण्यात यावी असेही शिक्षण विभागाने सांगितले आहे .
आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ( त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस ) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी ( त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस ) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील , असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे .
Comments are closed