डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण संपादन केले. ते अमेरिकेत गेले आणि पीएच.डी. झाले. ते इंग्लंडला गेले बॅरिस्टर झाले. त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले. त्यांच्या जीवनात अनेक संकटं आली परंतु ते डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. त्यांनी हिमतीने संकटावर मात केली. संकटंसमयी ते रडणारे नव्हते, तर लढणारे होते. ते संकटाला संधी समजणारे होते, म्हणून आज त्यांचे नाव जगविख्यात आहे.

भारतात आल्यानंतर त्यांनी नियतकालिके चालविले. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता इत्यादी नियतकालिकातून समाजजागृती केली. त्यांची पत्रकारिता गुलामगिरी विरुद्ध लढण्यासाठी होती, ते स्पष्ट भूमिका घेणारे पत्रकार होते. ते नामवंत संपादक होते. ते जसे पत्रकार होते तसेच ते अभ्यासक होते, त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी शिका,संघटित व्हा, संघर्ष करा, असा संदेश दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षणतज्ञ होते. ते मुंबई येथे नामवंत प्राध्यापक होते. त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय आणि मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर परिवर्तनासाठी शिक्षण ही त्यांची शिक्षणाबाबत भूमिका होती. याचा अर्थ ते सडेतोड शिक्षणतज्ञ होते.

अमेरिकेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘कास्ट इन इंडिया’ नावाचा ग्रंथ लिहिला. तसेच पुढे त्यांनी ‘अनिहीलेशन ऑफ कास्ट’ नावाचा अभिजात ग्रंथ लिहिला. त्यांनी केलेले भारतीय जातीव्यवस्थेचे विश्लेषण, यावरून ते मानवशास्त्रज्ञ (अंथरोपोलॉजीस्ट) होते, हे सिद्ध होते. आपल्या देशातील अस्पृश्यतेचे मूळ जातीव्यवस्थेत आहे, जातिव्यवस्थेचे मूळ वर्णव्यवस्थेत आहे आणि वर्णव्यवस्थेचे मूळ धर्मव्यवस्थेत आहे, चुकीच्या धार्मिक धारणा नष्ट झाल्याशिवाय आपल्या देशातील विषमता संपणार नाही, हे भारतीय जातिव्यवस्थेचे अचूक विश्लेषण त्यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ चार भिंतीच्या आत अभ्यास करून उपदेश करणारे पारंपरिक विचारवंत नव्हते, तर रस्त्यावर उतरून व्यवस्थेविरुद्ध लढणारे लढाऊ विद्वान होते. विषमता पोसणाऱ्या धर्माविरुद्ध त्यांनी बंड केले. त्यांनी महाड येथे चवदार तळ्याचे आंदोलन केले. अन्याय अत्याचार करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले, काळाराम मंदिराचे आंदोलन केले, गोलमेज परिषदेत जाऊन भारतातील शूद्रातिशूद्रांना हक्क अधिकार मिळावेत, यासाठी अभ्यासपूर्ण आवाज उठविला, यावरून स्पष्ट होते की ते विद्वत्तेची प्रतिमा गोंजारत बसणारे नव्हे, प्रतिमाप्रेमी नव्हते, तर रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने लढणारे विद्वान होते. ते स्वतःची आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध प्रतिमा कुरवाळत बसले नाहीत. अर्थात ते प्रतिमा प्रेमात अडकणारे नव्हते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना हक्क अधिकार मिळावेत, यासाठी विधिमंडळावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता, त्यांनी खोती पद्धती नष्ट करून कुणब्यांना न्याय देणारा कायदा केला, दुष्काळग्रस्त भागांना पाणी मिळावे,यासाठी नद्याजोड प्रकल्पाची योजना आणली, शासनाने शेतकऱ्यांना पाणी आणि वीज मोफत दिली पाहिजे, ही त्यांची मागणी होती. भारतीय शेती, शेतकरी, त्याच्या समस्या आणि उपाययोजना यावरती त्यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’ हा ग्रंथ लिहिला, यावरून स्पष्ट होते की ते जलतज्ञ आणि कृषीतज्ञ देखील होते.

डॉ.आंबेडकरांनी अर्थशास्त्रात एम.ए. आणि पीएच.डी. केले. त्यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपया’ हा ग्रंथ लिहिला.ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ होते. ते भारतीय अर्थव्यवस्थेचे महान भाष्यकार होते. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते बॅरिस्टर होते परंतु लोककल्याणासाठी राजीनामा देऊन ते सार्वजनिक जीवनात उतरले. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर ते अब्जाधीश झाले असते. त्यांनी स्वतःचा नव्हे तर सकल उपेक्षित समाजाचा विचार केला, म्हणून आज ते अजरामर आहेत. जे फक्त स्वतः साठी जगतात ते जिवंतपणीच मेलेले असतात आणि जे सर्वांसाठी जगतात ते कायमचे जिवंत असतात. बाबासाहेब कायम अजरामर आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘हू वेअर द शूद्राज’ नावाचा अप्रतिम ग्रंथ लिहिला. “जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही” असा विचार त्यांनी मांडला. त्यांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले. शिवरायांचे पुतळे बनवून घेतले, शिवजयंती उत्सव साजरा केला. ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. यावरून स्पष्ट होते की ते इतिहासतज्ञ होते. ते बदलापूर येथील त्रिशताब्दी शिवजयंती महोत्सवाचे प्रमुख पाहुणे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व संविधानाचा- कायद्याचा अभ्यास केला होता. ते नामवंत बॅरिस्टर होते. नामवंत वकील होते. आपल्या देशाला त्यांनी संविधान दिले. अनेक जाती, अनेक धर्म , पंथ , प्रांत , भाषा, संप्रदाय आणि विविधता यांना जोडून ठेवणारा राष्ट्रवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला. ते नामवंत कायदेतज्ञ घटनातज्ज्ञ होते. त्यांनी संविधान निर्मितीसाठी 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस अविरत परिश्रम घेतले. त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला सुपूर्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू ,जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इस्लाम, शीख ,पारशी इत्यादी धर्मग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यांनी ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हा अप्रतिम ग्रंथ लिहिला. यावरून स्पष्ट होते ते धर्मशास्त्राचे महान अभ्यासक होते. त्यांनी हजारो वर्षांच्या ब्राह्मणी धर्माचा त्याग करून लाखो अनुयायांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तत्पूर्वी 1935 साली त्यांनी येवला येथे “ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात, मरणार नाही” अशी प्रतिज्ञा केली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली .ते मजूर मंत्री होते आणि स्वातंत्र्योत्तर काळात ते भारताचे पहिले कायदामंत्री होते .ते सक्रिय राजकारणात होते. त्यांनी निर्भीडपणे भूमिका घेणारे राजकारण केले. त्यांचे राजकारण स्वार्थाचे नव्हे, तर लोककल्याणकारी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्तम राजनेता देखील होते. राजकारण वाईट नाही, चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत, हे त्यांचे जीवनचरित्र सांगते. त्यांनी राजसत्तेचा उपयोग स्वतःचा कुटुंबासाठी नव्हे, तर लोककल्याणासाठी केला.

वरील सर्व विवेचनावरून स्पष्ट होते की डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विद्वान होते, शिक्षणतज्ञ होते, जलतज्ञ होते, कृषीतज्ञ होते, मानवतज्ञ होते, इतिहासतज्ञ होते, लढवय्ये विचारवंत होते , घटनातज्ञ होते ,राजनेता होते ,एक व्यक्ती एका आयुष्यात किती क्षेत्रांमध्ये काम करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांचे इतक्या विषयावर प्रभुत्व होते की प्रश्न पडतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय नव्हते ?. अशा महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. ते शरीराने गेले पण कार्याने आणि विचाराने कायम जिवंत आहेत. जे दुसऱ्यासाठी जगतात ते मृत्यूनंतर देखील जिवंत असतात. अशा महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

– डाॅ. श्रीमंत कोकाटे.

 

 

 

 

 




 


 

 

Comments are closed

error: Content is protected !!