दापोडी,दि. १४( punetoday9news):-पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
” अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथील काळाराम मंदिराच्या पायऱ्यांवर आपल्या अनुयायांसह सत्याग्रह केला आणि कायद्याने मंदिर प्रवेश मिळवून दिला. गावच्या पाणवठ्यावर अस्पृश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. याकरता महाड येथे चवदार तळ्याचे पाणी चाखून बाबासाहेबांनी ते तळे खुले केले. यासारख्या असंख्य चातुर्वर्ण्याच्या अनिष्ट रूढीं विरोधात बाबासाहेबांनी बंड करून अस्पृश्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे ते अस्पृश्य बरोबरच बहुजनांचे दैवत बनले आहे. ” असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे सहायक सचिव रामेश्वर होनखांबे यांनी दापोडी येथे केले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व डी टी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जयंती जयवंत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या अंजली घोडके, उपप्राचार्य विठ्ठल कढणे, कनिष्ठ महाविद्यालयचे विभाग प्रमुख विजय बागडे, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव हेमंत बगनर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर सहाय्यक सचिव होनखांबे यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक अनिरुद्ध काळेल, पर्यवेक्षक रवींद्र फापाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदर व्यक्त करत आपले विचार मांडले.
होनखांबे पुढे म्हणाले, ” भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रीमंडळात बाबासाहेब कायदामंत्री झाले. परंतु त्यांनी शेतकरी व मजूर यांच्या उद्धारासाठी मांडलेले कायदे अमान्य झाल्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. डॉ आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झाल्यामुळे बहुजनांसाठी राखीव जागा मिळाल्या.
मनोज नारायणकर यांनी सर्वांचे आभार मानले. प्रशालेतील कार्यक्रमानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनी दापोडी गावातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ एकत्र आले. प्राचार्या घोडके व इतर शालेय पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन केले.
Comments are closed