पिंपळे गुरव, दि. १४( punetoday9news):- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागातर्फे समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. संविधानाची प्रत देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची प्रतिज्ञा यावेळी करण्यात आली. दरम्यान, शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना संतोष चव्हाण यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची पुस्तके भेट देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजू लोखंडे उपस्थित होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, अनुसूचित जमाती सेलचे शहराध्यक्ष विष्णू शेळके, शहर सामाजिक न्याय विभागाध्यक्ष विनोद कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिलेवार, तानाजी जवळकर, मुकेश पवार, नितीन सोनवणे, जावेद शेख, सतिश चोरमले, पकाश पवार, महेश माने, निसार शेख, आरिफ शेख, संतोष रायचूरकर, मोनिका जाधव, प्रभागाध्यक्षा संजीवनी पुराणिक, विनय शिंदे, वैशाली ढोरे, सुनिता अळसुळे, शैलेश दिवेकर, मंगेश शेळके आदी उपस्थित होते.
अरुण पवार यांनी सांगितले, की समता हा जीवनाचा व यशाचा मार्ग असून, स्त्री पुरुष, जाती भेद, प्रांतवाद असा भेदभाव न करता समान संधी मिळाल्याने दीन दलित आणि आदिवासी बांधवांना प्रवाहात येण्याची संधी मिळाली. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांनी अंगीकारून त्याप्रमाणे वाटचाल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जगाला प्रेरणादायी असून, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचे सांगत समतेचा वारसा आणि वसा आम्ही सचोटीने चालवू असे आश्वासन दिले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पिलेवार यांनी समता सप्ताह आयोजनामागील संकल्पना व त्याचे महत्त्व मांडले. तसेच शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात हा उपक्रम मोठ्या उत्साहत राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विष्णू शेळके म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात संवर्धित झालेला समतेचा विचार सुराज्याच्या मार्गाने महात्मा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानात उमटला आहे. संपूर्ण जगाला त्याच विचाराने एक दिशा आणि क्रांतीचा प्रकाश दिला आहे. आज देशाच्या सामाजिक, राजकीय दिशा जातीयवादाने अंधकारमय झाल्या आहेत. त्या उजळण्याचे सामर्थ्य फक्त समतेच्या मूलमंत्रात आहे.
संजीवनी पुराणिक यांनी बाबासाहेबांचे स्री मुक्तीच्या लढ्यातील योगदान सांगत स्त्रियांना समान दर्जा देण्यासाठी संविधानातील तरतुदीबाबत विवेचन केले.
कार्यक्रमात राजू लोखंडे, वैशाली ढोरे, मोनिका जाधव, तानाजी जवळकर, मुकेश पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिलेवार यांनी तर जावेद शेख यांनी आभार मानले.
Comments are closed