पुणे दि.११ ( punetoday9news):- इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावातील शेतकरी तुतीची लागवड करून रेशीम व्यवसायाकडे वळत आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि रेशिम संचालनालयातर्फे अल्पभूधारक शेकऱ्यांना अनुदान देण्यात येत असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरला आहे.
साधारण २ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात मोजके शेतकरी २००६ पासून या क्षेत्राकडे वळले आहेत. त्यातील काहींनी पुन्हा पारंपरिक शेती सुरू केली. मात्र गेल्या दोन वर्षात रेशमाच्या कोशाला मिळणारा चांगला दर आणि इतर पिकांपेक्षा अधिकचे होणारे उत्पन्न यामुळे शेतकरी तुतीच्या लागवडीकडे वळले आहेत.
पाच वर्षापूर्वी केवळ ५ ते ६ शेतकरी तुतीची लागवड करीत होते. गेल्यावर्षी ही संख्या ३६ वर पोहोचली आणि ७३ नव्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. इंदापूर तालुक्यातील ३११ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करण्यात आली असून त्यापैकी ३६ एकर म्हसोबावाडीतील आहे. यात आणखी प्रति शेतकरी एक एकर याप्रमाणे ७३ एकरची भर पडणार आहे.
शेतकरी रेशीम उद्योगासाठी लागणारे अंडीपूंज कर्नाटक अणि गडहिंग्लज येथून आणतात. काही बाल्या वस्थाद केंद्रात (चॉकी सेंटर) १० दिवस सांभाळलेल्या बाल्यावस्थेतील अळ्यादेखील उपलब्ध होतात. संगोपन गृहातील बेडवर १७ ते १८ दिवसात कोश तयार होतात. हे कोश साधारण ५ ते ६ दिवसात विक्रीसाठी तयार होतात. पहिल्यावर्षी एक किंवा दोन बॅच घेता येतात. नंतर पाच बॅचपर्यंत उत्पादन वाढविता येते.
असे आहे अर्थकारण
एक एकर क्षेत्रात २५० अंडीपूंजाची एक बॅच असते. १००० अंडीपूंजापासून सरासरी ८०० किलोपेक्षा अधिकचे कोश तयार होतात. सरासरी ६०० रुपये दराने ४ लाख ८० हजार उत्पन्न मिळते. दर चांगला मिळाल्यास हे उत्पन्न ७ लाखापर्यंतही जाते. एका बॅचला सरासरी २५ हजार खर्च येत असल्याने रेशीम उद्योग किफायतशीर ठरू शकतो.
शासनाचे मार्गदर्शन आणि अनुदान
पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी रेशीम उद्योगाचे अनुदान मिळविण्यासाठी पात्र आहेत. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगारा हमी योजनेअंतर्गत तीन वर्षासाठी १ लाख ६९ हजार १३६ रुपये अकुशल मजूरी, साहित्य क्षरेदीसाठी ६१ हजार ७३० रुपये, किटक संगोपन गृहासाठी अकुशल मजूरी ५२ हजार ८२४ आणि कुशल मजूरी ४९ हजार ५० असे एकूण ३ लाख ३२ हजार ७४० रुपये अनुदान मिळते.
म्हसोबावाडीत क्षेत्र सहाय्यक बाळासाहेब माने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्याने यावर्षी ७३ शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्वत: या क्षेत्राला भेट देऊन शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.
दरवर्षी १५ दिवस शेतकऱ्यांना नोंदणीची संधी असते. नवीन शेतकऱ्यांचे १५ दिवसांचे प्रशिक्षण रेशीम संचालनालयातर्फे घेण्यात येते. त्यांना ८०० अंडीपूंजासाठी एका वर्षाला ७५ टक्के अनुदान देण्यात येते. शिवाय कोश तयार झाल्यानंतर दर ३०० रुपयांच्या आत मिळाल्यास प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्यात येते.
इंदापूर परिसरात सिंचनासाठी पाणी कमी आहे. इतर बागांच्या तुलनेत तुतीला पाणी कमी लागते. शिवाय दरमहा शाश्वत उत्पन्न देणारा हा उद्योग असल्याने आणि तुतीची एकदा लागवड केली की १२ ते १५ वर्ष लागवडीचा खर्च येत नसल्याने शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगाचा पर्याय स्विकारला आहे. अळ्यांनी खावून राहिलेला पाला जनावरांना खाद्य म्हणून किंवा कंपोस्ट खतासाठी वापरता येत असल्याने त्याचाही शेतकऱ्यांना फायदाच होतो. म्हणूनच म्हसोबावाडीची आता रेशीम उद्योगाची वाडी होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
मनोज चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी
इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. हा तसा कोरडा पट्टा असल्याने शेतकरी शेततळे करून कमी पाण्यात तुतीची लागवड करीत आहेत. आर्थिक उत्पन्न चांगले होत असल्याने स्वत: खर्च करून एक एकर क्षेत्र वाढविले.
नामदेव चांदगुडे, शेतकरी म्हसोबावाडी
पूर्वी ऊस, कांदा घ्यायचो. मात्र चांगले दर मिळत नसल्याने आणि पाणी अधिक लागत असल्याने रेशीम शेतीकडे वळलो. आता चार बॅचेसमधून ५ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. या उद्योगात कष्टही तुलनेत कमी आहेत.
बाळासाहेब माने, क्षेत्र सहाय्यक इंदापूर
शेतकऱ्यांना इतर पिकांपेक्षा हा व्यवसाय अधिक लाभदायक वाटल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. हा कोरडा पट्टा असल्याने कमी पाण्यात शेतकरी तुतीची लागवड करून शकतात. त्यांना मार्गदर्शन करून म्हसोबावाडीत आणखी क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न आहेत.
Comments are closed