पुणे दि.९ : जिल्हयातील हवेली तालुक्यामधील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज कोरोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याने थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा कोवीड-19 च्या कोरोना स्वॅब तपासणीकरीता बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
उपविभागीय अधिकारी हवेली यांच्याकडील अहवालानुसार कोरोना आजाराच्या संशयित रुग्णांची तपासणी करणा-या आय.सी.एम.आर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांच्या यादीमध्ये थायरोकेअर प्रयोगशाळेचा समावेश आहे. या प्रयोगशाळेमध्ये मौजे खानापुर ता.हवेली येथील धुमाळ कुटूंबातील व्यक्तींनी कोरोना विषाणूची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालाच्या निष्कर्षावर कुटूंबाने संशय व्यक्त केल्याने त्यांचे अहवाल पुन्हा एन.आय.व्ही. पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असता, सर्व धुमाळ कुटूंबाचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे स्थानिक जनतेने व गावातील इतर रुग्णांनी थायरोकेअर या प्रयोगशाळेच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला असल्याने ही कारवाई केल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
Comments are closed