पुणे, दि. २३ ( punetoday9news):- राज्यातील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरण (एआरए) हे सक्षम प्राधिकरण असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच एकाच वेळी सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देशही प्रवेश नियामक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.
प्रवेश नियामक प्राधिकरण आणि सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्या समन्वयातून १५ प्रवेश परीक्षांद्वारे विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण या स्वतंत्र संचालनालयांकडून प्रवेश प्रक्रियेचे नियोजन तयार करून ‘सीईटी सेल’ला पाठवले जाते. त्यानुसार त्यांच्याकडून प्रक्रिया राबवली जाते.
या प्रकारांत प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता राहत नसल्याचा आक्षेप घेऊन ‘असोसिएशन ऑफ द मॅनेजमेंट ऑफ अन एडेड इन्स्टिटय़ूटस् इन रुरल एरिया’ या संघटनेने शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकात सुसूत्रता असण्यासाठी, प्रवेश प्रक्रिया वेळेत संपण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.
त्यानंतर सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत संघटनेने मांडलेल्या मुद्दय़ांचा विचार करून १५ दिवसांत एकसमान प्रवेश प्रक्रिया करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. यानुसार प्रवेश नियामक प्राधिकरण आणि ‘सीईटी सेल’ला पत्र पाठवून एकाच वेळी प्रवेश प्रक्रिया राबवण्याबाबत ‘एआरए’ निर्णय घेण्याबाबत पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पिंपळे गुरव मध्ये भरणार होम मिनिस्टर चा खेळ.
भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी.
Comments are closed