मृग बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करण्याकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी.

 

पुणे दि.31( punetoday9news):- संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यांमध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना मृग बहार 2022 मध्ये राबविण्यात येत आहे.

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणे बाबत अथवा न होण्याबाबत घोषणापत्र पिककर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बँकेत जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास तसे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे, जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना न कळविल्यास शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने किंवा भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. एका शेतकऱ्यास मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

फळ पीक विमा योजना मृग बहार सन २०२२ मध्ये अहमदनगर, अमरावती, नाशिक, वाशिम, यवतमाळ, धुळे, पालघर, सोलापुर, नागपूर जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (ग्राहक सेवा क्र.: १८००१०२४०८८/०२२-६८६२३००५, ई-मेल:-rgicl.maharashtraagri@relianceada.com), बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, वर्धा, ठाणे, हिंगोली, सातारा, परभणी, जालना, लातुर, कोल्हापूर जिल्ह्यांसाठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कं. लि. (ग्राहक सेवा क्र.:१८००२६६०७००/०२२-६२३४६२३४, ई-मेल:- pmfby.maharashtra@hdfcergo.com) आणि बुलढाणा, जळगाव, नांदेड, पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड (टोल फ्री क्र.:१८००४१९५००४/०२२-६१७१०९१२, ई-मेल – pikvima@aicofindia.com) या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.

मृग बहार सन २०२२ मध्ये संत्रा, द्राक्ष, पेरु आणि लिंबू या पिकांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत १४ जून २०२२, मोसंबी आणि चिकूसाठी ३० जून, डाळींबासाठी १४ जुलै आणि सिताफळासाठी ३१ जुलै २०२२ अंतिम मुदत आहे.

मृग बहार सन 2022 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला असून निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे. मृग बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करण्याकरीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) या संकेतस्थळास भेट द्यावी.

शेतकऱ्यांनी फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक/वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. मृग बहारातील फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमाहप्ता आदीबाबतीत सविस्तर माहितीचा 18 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयात आणि कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाव उपलब्ध आहे. तसेच ई- सेवा केंद्र व बँक स्तरावरही याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना कृषी विभागाने सहभागी विमा कंपन्यांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे जिल्हा /तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कृषी उपसंचालकांनी कळविले आहे.

 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर. कोणता प्रभाग राखीव, कुठे महिला राखीव साठी येथे क्लिक करा.

 

Advt:-

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!