● लेवा भातृ मंडळाच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराचा समारोप.
पिंपरी,दि. २( punetoday9news):-
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी मुला मुलींना वृक्षारोपण व पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. तसेच मुला मुलींसमवेत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या वृक्षांना पाणी घालून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जपावे, असे आवाहन वृक्षमित्र अरुण पवार यांनी केले.
मुला-मुलींनी कुटुंबात जेवढ्या व्यक्ती असतील, तेवढी झाडे लावण्याचे यावेळी आश्वासन दिले.
निमित्त होते पिंपळे सौदागर येथील लेवा भातृ मंडळाच्या वतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल ज्ञान मंदिर, निगडी येथे आयोजित उन्हाळी शिबिराच्या समारोपाचे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक सारिका पाटील व मनीषा पाटील यांनी, तर सूत्रसंचालन अशोक भंगाळे यांनी केले.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलांची विचारशक्ती वाढविणे, भावना व बुद्धीचा विकास, एकाग्रता वाढविणे, स्मरणशक्ती वाढविणे, व्याधीपासून दूर ठेवणे आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. लष्कराची ओळख व्हावी, म्हणून एनडीए भेट, संशोधन वृत्ती जागृतीसाठी सायन्स पार्क भेट घडविण्यात आली. योगशिक्षक कृष्णाजी खडसे यांनी शारीरिक शिक्षण व ध्यान, रवींद्र बऱ्हाटे यांनी संभाषण कला, चित्रकार वैशाली नारखेडे यांनी चित्रकला, वैदिक गणितज्ज्ञ मनाली चौधरी यांनी अंक गणितातील गमतीजमती, प्रा. माधवी राणे यांनी मेंदू विकास, शौर्य मार्शल आर्ट पियुष यांनी स्वसंरक्षणाचे धडे, अशोक भंगाळे यांनी विज्ञानातील जादुई प्रयोग, सारिका पाटील व मनीषा पाटील यांनी अभिवाचन, अशोक पानवलकर यांनी क्रिएटिव्हिटी, सेजल पाटील यांनी पत्रलेखन, अविनाश बायस्कर यांनी संगणकाच्या विश्वात, दिलीप शिंदे यांनी सामाजिक दायित्व, अजय त्रिपाठी यांनी चमत्कार व विज्ञान आदी विषयांवर मार्गदर्शन, प्रात्यक्षिके करण्यात आली.
या व्यतिरिक्त मुलांमध्ये साहस वाढीस लागावे, यासाठी घोड्यावरून रपेट, दोरीच्या साहाय्याने वर चढणे, वाहतूक शिस्त, आपत्ती व्यवस्थापन, तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
__________________________________
Advt:-
Comments are closed