नंदुरबार :- प्रसार माध्यम ही भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपल्या लेखनीची शक्ती अडचणीतील लोकांसाठी वापरली पाहिजे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल तसेच अडचणीत असलेल्या पत्रकार बांधवांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करत विमा संरक्षण लागू झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा व तालुका पदाधिकार्यांशी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शुक्रवार दि. १० जुलै रोजी वेब संवाद करत समस्या जाणून घेतल्या. राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वसंत मुंडे हे प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी संवाद साधत संकटाच्या काळात धैर्याने लढण्याचा आणि अडचणीतील लोकांना मदत करत आपल्या सहकार्यांना साथ देण्याचा विश्वास निर्माण करत आहेत. लोकशाहीत प्रसार माध्यम चौथा स्तंभ असल्याने पत्रकारांनी आपली क्षमता लोकहितासाठी वापरावी. उद्योग धंदे बंद झाल्याने विभागीय आणि जिल्हास्तरावरील दैनिकांचे प्रकाशन बंद पडल्याने पत्रकारांसह हजारो लोकांवर बेरोजगारीचे व आर्थिक संकट ओढावले आहे. अशा काळात पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी आपल्या क्षेत्रातील सर्व घटकातील पत्रकार बांधवांना मदत करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले. राज्यभरात पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी अडचणीतील सहकार्यांना साथ देण्याची भूमिका घेतली असल्ययाचे अनेक ठिकाणचे दाखलेही त्यांनी दिले. तर कोरोनाच्या काळात राज्य सरकारने आरोग्य व पोलिस कर्मचार्यांना पन्नास लाखाचे विमा कवच जाहीर केल्यानंतर राज्य मराठी पत्रकार संघाने लोकात जावून काम करणार्या आणि शासन व प्रशासनाला वस्तुस्थितीची जाणीव करुन देणार्या पत्रकारांनाही विमा कवच देण्याची मागणी लावून धरली. छोट्या वृत्तपत्रांसमोर कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणी ची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आलेली आहे. अनेक वर्ष ठाकरे यांनी दैनिकाची जबाबदारी सांभाळली असल्याने त्यांच्याकडून पत्रकारांना अपेक्षा असूून माध्यम क्षेत्रासाठी भरीव तरतूद होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संघटनेत जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करताना नेमके कशा पध्दतीने काम करावे याबाबत उपयुक्त मार्गदर्शनही त्यांनी केले. थेट जिल्हा आणि तालुका पातळीवरील पत्रकारांना प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधून आपल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने संकटाच्या काळात पत्रकारांमध्ये वेब संवादाने आत्मविश्वास वाढला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष जगदिश सोनवणे यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा वसंत मुंडे यांनी केली. यावेळी ग्रामीण चे जिल्हा अध्यक्ष गुरव, जनशक्ती चे जिल्हा प्रतिनिधी रविंद्र चौव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज चे विशाल माळी, तळोदा तालुका अध्यक्ष महेंद्र लोहार, गर्जा महाराष्ट्र चे जीवन माळी, शहादा चे विनय जैन, न्यूज ११ चे अनिल राठोड, साप्ताहिक नंदुरबार टॉवर चे प्रेमचंद राजपूत, टाइम्स न्यूज चे जितेंद्र जाधव तसेच जिल्ह्यातील विविध दैनिकाचे, साप्ताहिक तसेच वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी चर्चेत सहभागी झाले होते.
Comments are closed