पुणे,दि. १३( punetoday9news):-
खडकी, पुणे विद्यापीठ परिसरात असलेल्या मोठ मोठ्या झाडांच्या पोफळीत पोपटांनी वास्तव्य केले आहे. मात्र, पोपटाची पिल्ले तारेच्या आकड्यांच्या साहाय्याने काढताना झाडावरून खाली पडून मरत आहेत आणि जी जिवंत राहिली आहेत, त्यांची खडकी, शिवाजीनगर परिसरात अवैधरित्या विक्री केली जाते. पोपटांच्या पिल्लांचे हाल करणाऱ्या पक्षीद्रोही रॅकेटवर कठोर कारवाई करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
  माणसांच्या हौशीखातर आयुष्यभर पिंजऱ्यात फडफडणारे पोपट मिठू मिठू करत मरून जातात. पोपटांची पिल्ले पकडून त्यांची विक्री करणाऱ्यांचे रॅकेटही मोठे आहे.
या पार्श्‍वभूमीवर पोपट विक्री करणाऱ्यांविरुद्ध वनविभाग कारवाई केल्याचे भासवते. पण खडकी, पुणे विद्यापीठ परिसरात वनविभागाने दररोज गस्त घालणे आवश्यक बनले आहे. पोपट विक्रेत्यांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. झाडांवरून पोपट काढणाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला तर उद्धटपणे अर्वाच्य भाषेचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांची इच्छा असूनही पोपटांच्या पिल्लांचा जीव वाचवता येत नाही.
अनेकदा झाडांच्या पोपळ्यांमधून पोपटाची पिल्ले काढताना ती खाली पडतात आणि जीव जातो. मोठे पोपट या झाडावरून त्या झाडावर जीवाच्या आकांताने आवाज काढतात. पण ही नवजात पिल्ले घेऊन जाताना निर्ढावलेल्या लोकांवर काही परिणाम होत नाही.
 सूचीबद्ध प्राणी आणि पक्ष्यांना घरात पाळण्यापूर्वी वनविभागाची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, पोपट पाळण्यासाठी वनविभागाने परवानगी दिलेली नाही. पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून, त्याला मुक्त संचाराचा हक्क आहे. त्याचे आयुष्य पिंजऱ्यात बंद करणे हा कठोर गुन्हा असल्याने पोपटाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
     – रामभाऊ जाधव, पुणे जिल्हाप्रमुख, छावा मराठा संघटना



 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!