पिंपरी, दि. १५( punetoday9news):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करून उत्साही आणि आनंदी वातावरणात त्यांच्या शालेय जीवनाची सुरुवात झाली. क्रांतिसूर्य जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शाळेचा पहिला दिवस “शाळा प्रवेशोत्सव” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शाळांच्या इमारती लहान बालकांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा गजबजल्या.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या निर्देशानुसार महापालिकांच्या शाळेत शाळेचा पहिला दिवस हा शाळा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या सोबत आलेल्या पालकांचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वागत केले तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
महापलिकेच्या ८२ शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढला आहे. मागील आठवड्यात महापालिकेच्या बोपखेल येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
खाजगी शाळेत मोठ्या प्रमाणात फी आणि इतर खर्च करावा लागतो. त्या तुलनेत महानगरपालिकांच्या शाळामध्ये मोफत व दर्जेदार शिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळांमध्ये ई – क्लास उपक्रमांतर्गत प्रत्येक वर्गात स्मार्ट टी. व्ही. संगणक आणि गणित कक्ष यांची सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण आणि शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर शक्य झाला आहे. तसेच प्रत्येक शाळेत विज्ञान, गणित आणि संगणक शिकविण्यासाठी स्वतंत्र तज्ञ मार्गदर्शकांची नेमणूक केली आहे. खाजगी शाळाप्रमाणे महानगरपालिकांच्या
शाळेतदेखील उत्तम सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. सर्व मुलांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय साहित्य व दुपारचे जेवण (मध्यान्ह भोजन) ही मोफत दिले जाते. विविध शिष्यवृत्यांचा लाभही दिला जातो. एम.एस.सी.आय.टी संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ‘बाला’ उपक्रमांतर्गत शालेय भिंती वर्ग व शालेय परिसर हा विविध चित्रे यामधून आकर्षक झालेला आहे. मोफत व दर्जेदार शिक्षण यामुळे यावर्षी ५५० विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शाळामध्ये दाखल झालेले आहेत. आकांक्षा फाउंडेशन सोबत करार करून ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा शहराच्या विविध भागात सुरु आहेत. सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी, शिष्यवृत्ती, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, इंग्रजी उपक्रम स्पर्धा यासारख्या स्पर्धा घेतल्या जातात. मातृभाषा आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणीदेखील केली जाते. १० वी आणि १२ वी मध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात रोख रक्कम दिली जाते.
पिपरी चिंचवड महानगरपालिकांच्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना दिली जाते. या वर्षी इंग्रजी, कराटे, मल्लखांब, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी आणि धाडसी खेळ यांना चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
Comments are closed