पिंपरी, दि. २५ ( punetoday9news):- राज्यातील शहरी व गामीण भागातील खासगी जागेवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

अशी परवानगी मिळावी यासाठी चिंचवड मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे आणि विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सरकारने ही परवानगी दिल्यामुळे आमदार जगताप यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, आता सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आमदार निधीतून एकूण ९ प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.

आमदारांना मिळणारा स्थानिक विकास निधी कोणत्या कामांसाठी वापरायचा, त्याची मार्गदर्शक तत्वे ठरलेली आहेत. त्यानुसार खासगी जागेवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांना पायाभूत व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीतून खर्च करण्याची तरतूद नव्हती. परंतु गृहनिर्माण संस्थांना काही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या निधीतून खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याबाबत त्यांनी सरकारचे संबंधित मंत्री आणि विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तसेच विधानसभेच्या सभागृहात अनेकवेळा प्रश्नही उपस्थित केले होते.

त्यानंतर राज्य सरकारने आमदार निधीच्या खर्चाबाबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्याचे ठरविले. महानरपालिका

नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रातील तसेच या नागरी क्षेत्रांना लागून असलेल्या ग्रामीण परिसरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या खासगी जागेवर निवडक पायाभूत वा अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी खर्च करण्यास परवानगी देण्याबाबत सरकार पातळीवर विचार सुरू झाला. आमदार निधी खर्च करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोणकोणत्या सुधारणा वा बदल करणे संयुक्तिक राहील, याचा अभ्यास करण्यासाठी नियोजन विभागाची एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानंतर मंत्रिमंडळ उपसमितीने आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत.

त्यानुसार खासगी जागेवरील सहकारी गृहनिर्माण सस्थांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार निधीचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याबाबत राज्याच्या नियोजन विभागाने २२ जून २०२२ रोजी आदेश जारी केला आहे. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पायाभूत सुविधांवर आमदार निधी खर्च करण्यास परवानगी मिळावी म्हणून आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे आता गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सांडपाण्याच्या पुनर्वापराची यंत्रणा, सोलर सिस्टीम, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जींग सेंटर, अंतर्गत रस्त्यांची निर्मिती, जॉगिंग ट्रॅक तयार करणे, हरितपट्टा व बालोद्यान तयार करणे, सीसीटीव्ही कॅमेर बसविणे, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था करणे याप्रकारच्या पायाभूत सुविधांसाठी आमदार निधी खर्च करता येणार आहे

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!