मुंबई (दि. 25) : रविवार दि. 26 जून रोजी राज्यभरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती व त्यानिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम, अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

“राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केले जाते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देतो;” असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे समता रॅली, विविध विषयांवरील व्याख्याने, अभिवादन कार्यक्रम आदी उपक्रम स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित केले जाणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

मागील अडीच वर्षांच्या काळात सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वंचित-उपेक्षित घटकांपर्यंत विभागाच्या योजनांचा लाभ पोहोचवता यावा, यादृष्टीने अनेक सकारात्मक निर्णय घेतले. वाड्या-वस्त्यांची जातीवाचक नावे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, राज्य सरकार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहे, हेही राज्यातील सर्व जनतेने पाहिले. विभागाची प्रत्येक योजना ही संबंधित विषयातील खऱ्या गरजू पर्यंत पोहोचावी अशा दृष्टीने अनेक सकारात्मक बदल केले व त्याचे परिणाम निश्चितच लाभार्थी घटकांमधून दिसून येत असून, पर्यायाने नेहमी दुय्यम समजल्या जाणाऱ्या सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम आम्ही प्रामाणिक भावनेतून केले व असे करणे आमचे कर्तव्यच असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

 

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!