पिंपरी, दि १४ :- सांगवी स्मशानभूमीजवळ सुमारे दोन हजार चौरस फूट जागेत पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदा ताडी विक्री दुकानावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी ( दि.१३ ) कारवाई करत दुकान जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले .

 ताडी विक्री दुकानाबाबत सांगवी परिसरातील महिलांच्या तक्रारी होत्या परंतु कोणतीच कारवाई होत नव्हती . त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती . करोनामुळे निर्माण झालेल्या संकटात सर्वसामान्यांना घर चालविणे मुश्किल झाले होते . तसेच ताडी पिऊन येणाऱ्यांच्या कुटुंबात वाद होत होते . काही कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ आली होती . त्यामुळे या दुकानास महिलांचा विरोध वाढला होता . अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताडी विक्री केंद्रावर कारवाई केली . या कारवाईत ८०० लिटर ताडी जप्त करण्यात आली . ४ बॅरल , मोकळ्या बाटल्यांसह एकूण १७ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल होता . सकाळी दहा वाजता कारवाईला सुरुवात झाली . सुमारे दीड तास ही कारवाई सुरू होती . जेसीबीद्वारे ताडी विक्री सुरू असलेले पत्राशेड तोडण्यात आले . राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आर.पी.शेवाळे , दुय्यम निरीक्षक एस.सी.भवड , दयानंद माने , अमोल दळवी , रवींद्र भुमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली .

Comments are closed

error: Content is protected !!