पुणे, दि. ३०( punetoday9news):- चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी बुधवारी (दि. २९) मीटर रिडींग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत दिला.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे आदी प्रकार दिसून आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ११० मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची पुणे येथील ‘प्रकाशभवना’मध्ये बुधवारी बैठक झाली. यावेळी संचालक (संचालन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक (प्र.)  अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री संजय पाटील (देयके व महसूल), सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) उपस्थित होते. या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.

संचालक (संचालन)  संजय ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलींगचामुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. दैनंदिन पर्यवेक्षण करावे. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्याव्यात असे निर्देश यावेळी संचालक ताकसांडे यांनी दिले.

 




 

 

Comments are closed

error: Content is protected !!