शालेय ग्रंथदिंडी वारी : चिमुकल्या वारकऱ्यांचे सर्वांना आकर्षण.
● नवी सांगवीच्या शाळेत बालचमूंचा पालखी सोहळा.
● विठ्ठल नामाची शाळा भरली. जनजागृती घोषणांनी दुमदुमली सांगवी.
नवी सांगवी , दि. १ ( punetoday9news):- ‘ विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी’चा जयघोष करत आज पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील जनता शिक्षण संस्थेच्या ब्लाॅसम इंग्लिश मेडियम केजी, प्रायमरी स्कूल व एस.जे.एच गुरूनानक हायस्कूल मध्ये एका अनोख्या दिंडीचे आयोजन झाले .
संत साहित्य , महाराष्ट्रातील संत परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व शालेय जीवनात भक्ती, शक्ती, विनम्रता, सहनशीलता हे गुण विद्यार्थ्यामध्ये रूजावेत प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नसले तरी , वारीचा अनुभव मात्र विद्यार्थ्यांना घेता यावा , यासाठी पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नंदा काकडे व तबस्सुम बादशाह यांच्या हस्ते ग्रंथ व साहित्यिकांच्या पुजनाने ग्रंथदिंडी पालखी सोहळ्यास सूरूवात झाली.
वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनींसह केलेला पालखी सोहळा परिसरातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला . तसेच पालखीतील रिंगण सोहळ्याने उपस्थितांना जणू पंढरीचे दर्शन घडविले.
विठ्ठलनामाच्या गजरासह नवी सांगवीतील साई चौक ते फेमस चौक मार्गे प्रभात फेरी काढण्यात आली . टाळ – मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांसह शिक्षक , पालकही तल्लीन झाले.
विठ्ठल – रखुमाई , संत ज्ञानेश्वरांसह वारकऱ्यांच्या वेशभूषा चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या . या दिंडीला पारंपरिक वारीचे स्वरूप यावे यासाठी दिंडीमध्ये सर्वात पुढे सजविलेली पालखी , पाठीमागे वारकऱ्यांचा वेष परिधान केलेले विद्यार्थी , नऊवारी साड्या नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी , पाना – फुलांनी सजविलेल्या पालखीच्या पुढे – मागे भगव्या पताका , गळ्यात टाळ , कपाळी गंध , भजनात दंग झालेले चिमुकले वारकरी अशी रचना सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते.
या सोहळ्याचे नियोजन शिक्षक सागर झगडे, शिक्षिका प्रियंका लोमटे व शीतल शिंदे यांनी केले. यावेळी शोभा मुळीक, प्रीती चव्हाण, दिपाली शहाणे, दर्शना सुर्यवंशी, निषाद पीरजादे, पुनम खंडागळे व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
Comments are closed