● बेशिस्त, बेकायदेशीर पार्किंग मुळे वाहनचालकांची कसरत.
● बेकायदेशीर पार्किंग मध्ये ही गाडी लावण्यावरून होतात वाद.
● तर परिसरातील बहुतांश पदपथावर भाजी विक्रेते व दुकानदारांचे अतिक्रमण.
● शाळकरी विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांसाठी मोकळे पदपथ नसल्याने रस्त्यावरून चालताना जीव मुठीत.
● सद्यस्थितीत केवळ कृष्णा चौक ते काटेपुरम चौक दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंगवर कारवाई.
● स्मार्ट सीटीत वाढतोय बकालपणा; प्रशासन कारवाई करणार का? नागरिकांचा संतप्त सवाल.
पिंपळे गुरव, दि.२( punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी,पिंपळे गुरव हा प्रचंड वेगाने विकसित झालेला परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील बहुतांशी नागरिकांनी आपल्या जागेत इमारती बांधून भाड्याने दिल्या आहेत मात्र आपल्या इमारतीत असलेल्या भाडोंत्रींची व स्वतःच्या वाहनांच्या पार्किंगची सोय केली नाही. त्यामुळे सर्रासपणे रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात.
या भागाचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने सिमेंटचे रस्ते, पदपथही झाले मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षपणाने या रस्त्यांवर वाहने बेकायदेशीर पार्किंग केली जात आहेत तर पदपथावर भाजी विक्रेते ठाण मांडून बसलेले असतात त्यामुळे स्मार्ट सिटी फक्त नावापूरतीच का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपळे गुरव मध्ये एम के हाॅटेल चौक ते मयुर नगरी, कांकरिया गॅस गोडाऊन ते सुदर्शन नगर, साई चौक ते फेमस चौक, काशी विश्ववेश्वर शाळा ते बँक ऑफ महाराष्ट्र चौक, सांगवीत पाण्याची टाकी ते संविधान चौक मुख्य रस्ता, साई चौक ते माहेश्वरी चौक (शंकर पुतळा) या ठिकाणी रस्त्याच्या कडेला नेहमीच चारचाकी वाहने उभी असतात यातील कित्येक वाहने महिन्यातून एकदा बाहेर निघतात व नेहमी एकाच ठिकाणी पार्क करून हे वाहनमालक रस्ता अडवतात. हे कमी की काय म्हणून अगदी या बेकायदा पार्किंगच्या जागेवरून हक्क सांगत आपसात भांडतातही त्यामुळे परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
तर दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या कामात झालेले पदपथ भाजी विक्रेते व दुकानदारांचे अतिक्रमण याने व्यापून गेले आहेत. काही ठिकाणी तर या पदपथावर दुचाकी वाहनेही पार्क केलेली असतात. त्यामुळे करोडो रूपये खर्च करून पदपथ नक्की कुणासाठी असा संतप्त प्रश्न सामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. यात नवी सांगवीतील फेमस चौक ते शनीमंदिर, फेमस चौक ते शिवनेरी चौक, साई चौक ते कृष्णा चौक या ठिकाणी भाजी विक्रेते व दुकानदारांनी पदपथावर कब्जा केला असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
त्यामुळे परिसरातील या बेशिस्त वाहन पार्किंग व पदपथावरील अतिक्रमणावर प्रशासनाने कडक कारवाई करून जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना पदपथ मोकळा करावा अशी मागणी होत आहे.
Comments are closed